‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका…’ गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. ‘रॉकी और रानी’मध्ये मराठमोळ्या क्षिती जोगने रणवीरच्या आईची भूमिका साकारल्याने अनेक मराठी कलाकारांनी तिचे कौतुक केले आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेने खास डान्स व्हिडीओ शेअर करत या क्षितीसह चित्रपटातील अन्य कलाकरांचे कौतुक केले आहे.
‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर भगव्या रंगाची साडी नेसून अभिज्ञाने डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया बुगडे तिला साथ देताना दिसते. अभिनेत्रीने डान्सचा व्हिडीओ शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. यामध्ये अभिज्ञा लिहिते, “या चित्रपटामुळे मी पुन्हा एकदा बॉलीवूडची जादू अनुभवली. यामध्ये सर्वांनी खूपच सुंदर काम केले आहे. आलिया भट्टला बंगाली मुलीच्या भूमिकेत पाहणे ही आमच्यासाठी एक ट्रीट आहे. रॉकी रंधावामुळे मी रणवीर सिंहच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहे. त्याची एनर्जी, संपूर्ण चित्रपटातील अभिनय थक्क करणारा आहे.”
अभित्रा पुढे म्हणाली, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमची क्षिती जोग…दिग्गज कलाकारांसमोर तू जो अभिनय केला आहेस तो पाहून खरंच आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटत आहे.” क्षितीने हा डान्स व्हिडीओ रिशेअर करत अभिज्ञाने केलेल्या कौतुकासाठी धन्यवाद म्हटले आहे.
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, क्षिती जोग, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ९० कोटींहून अधिक कमाई केली आहे.