राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून मराठा व खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा सर्वेक्षणासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. मराठी अभिनेता पुष्कर जोग याच्या घरी देखील महापालिकेच्या काही महिला सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. त्यांनी जातीसंदर्भात विचारपूस केल्याने पुष्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता.
पुष्करने शेअर केलेल्या पोस्टमुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही कर्मचारी संघटनांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होती. त्यामुळेच आता पुष्करने याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता या संपूर्ण प्रकारावर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने फेसबुक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीतची आई महापालिकेत शिक्षिका असल्याने घडल्याप्रकाराबद्दल त्याने तीव्र नाराजी व्यक्त करत पुष्कर जोगला सुनावलं आहे.
हेही वाचा : लगीनघाई! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल
अभिजीत केळकरची पोस्ट
प्रिय मित्र पुष्कर जोग यांस,
मित्रा, तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली, ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच…
मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती…तिच्याबरोबर, तिला, तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे. मदत केली आहे…उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात, वरून आदेश आला की, त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं, दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात…तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात…
१. घरी आलेल्या अशा या कर्मचाऱ्यांना लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटला नसेल?
२. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते, कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?
३. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल? (मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे)गेला बाजार, त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?
४. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस? तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?
आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात. आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं, वागणं फॉलो करतात, त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे…
मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला…तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही…ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील…
तुझा मित्र/शुभचिंतक
दरम्यान, अभिजीतने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह काही दिग्गज मराठी कलाकारांनी आपलं मतं मांडलं आहे. याशिवाय पुष्कर जोगने घडल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.