दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डेने (Abhinay Berde) काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट बराच गाजला. त्यानंतर अनेक चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. सध्या तो ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अभिनय नंतर लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी बेर्डेनेही (Swanandi Berde) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मात्र त्यांनी आजवर कधीच एकत्र काम केलेलं नाही. अशातच अभिनयने नुकतंच बहीणीबरोबर काम करण्याबद्दल सांगितलं आहे. अभिनयने ‘झी नाट्य गौरव’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला भविष्यात बहीण स्वानंदीबरोबर त्याच्या काम करण्याबद्दल विचारले. तेव्हा ‘इट्स मज्जा’शी बोलताना अभिनयने ‘स्वानंदीबरोबर नक्कीच काम करायला आवडेल’ असं म्हटलं.

याबद्दल अभिनय असं म्हणाला की, “हो… एकमेकांबरोबर काम करायला नक्की आवडेल. पण ते सहजरीत्या घडलं तर चांगलं होईल. म्हणजे आम्हा दोघांनाच घेऊन नाटक करायचं आहे म्हणून नाटक लिहा असं नको. कारण ते मला खूप उगाच किंवा मुद्दामहून केल्यासारखं वाटतं. त्यातून चांगलं नाटक होईलच अशी शाश्वती नसते. त्यामुळे चांगलं नाटक किंवा उत्तम संहिता मिळावी. त्यात आमचं कास्टिंग उत्तम असावं. तर आम्ही ते नक्कीच करु.”

दरम्यान, स्वानंदीने ‘मन येड्यागात झालं’ आणि ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर अभिनय ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’, ‘रंपाट’ आणि ‘बॉईज ४’ सारख्या चित्रपटांत झळकला आहे. सध्या रंगभूमीवर त्याचे ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक जोरात चालत असून या नाटकाला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे. यात त्याच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत, मुग्धा गोडबोले मुख्य भूमिकांत आहेत.