मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबत सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरून कलाकार त्यांना श्रद्धांजली देत आहेत. आता त्यांचा मुलगा अभिनय देव यांनी सीमा देव यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.
सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या अल्झायमर्स या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज सकाळी ७ च्या सुमारास यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच निधन झालं. आईच्या निधनाबाबत अभिनय देव यांनी शोक व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : Seema Deo Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून तिची तब्येत चांगली नव्हती. अल्झायमर्स, डिमेन्शिया या आजाराने तिच्या अवतीभवती एक वेगळंच वातावरण निर्माण केलं होतं. पण खरं सांगायचं तर माझी आई वयाच्या तेराव्या वर्षापासून वेगवेगळ्या रितीने झगडतच आली आहे. पण ती खूप खुश होती. मला माहित असलेल्या ग्रेट महिलांपैकी ती एक होती. पण आता एका अर्थाने तिचं झगडणं कमी झालं आहे आणि मला माहित आहे की ती आता एका चांगल्या जागी आहे.”
सीमा देव यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.