अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लहानपणी वडिलांबरोबर शूटिंग सेटवर जाऊन तो अनेक गोष्टी शिकला. पण त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं असा खुलासा आता त्याने केला आहे. याचबरोबर अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी तो काय काम करत होता हेही त्याने सांगितलं.
त्याने ‘राजश्री मराठी’ला नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्यात त्याने त्याचा संपूर्ण प्रवास सांगितला. तो म्हणाला, “मला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी मी एंट्रन्स परीक्षाही दिली. त्यातही मला चांगले मार्क होते. पण मला एमबीबीएससाठी एक पेड सीट मिळत होती. २५ लाख देऊन ती ॲडमिशन घ्यायची होती. पण मला वडिलांनी सांगितलं की, आपण कर्ज घेणार आणि तिथे ॲडमिशन घेणार. नंतर त्याचे हप्ते भरणार आणि शेवटी ते करून जर तुला कलाक्षेत्रातच काम करायचं असेल तर ती एक सीट वाया घालवू नकोस. मग मी नाही ती सीट वाया घालवली.”
पुढे तो म्हणाला, “मग मी बायोटेक्नॉलॉजी घेऊन त्यात बीएससी केलं. त्यानंतर पुढे एमबीए केलं. हे सगळं करत असताना मी माझ्या वडिलांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होतो, माझ्या शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरी बनवणं सुरू होतं. एमबीए केल्यावर मी नोकरी केली. मी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये असोसिएट एक्झिक्यूटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं. तेव्हा मी रोज बोरिवलीहून ट्रेनने चर्चगेटला जायचो, संध्याकाळी पुन्हा विरार ट्रेन पकडून यायचो.”
हेही वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं
त्यानंतर त्याने सांगितलं, “मी वॉक वॉटर मीडिया या कंपनीमध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून काही काळ काम करत होतो. तिथून बाहेर पडल्यावर मी आणि माझ्या वडिलांनी ‘कोठारे व्हिजन’ ही आमची कंपनी सुरू केली. तेव्हा चित्रपटांसाठी मी माझ्या वडिलांबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतच होतो. पण एका चित्रपटासाठी आम्हाला एक तरुण हिरो हवा होता, जो काही केल्या मिळत नव्हता. तेव्हा माझ्या वडिलांनी किंवा निर्मात्यांनी मला सांगितलं की तू ऑडिशन दे. लहानपणापासूनच अभिनयाचा तो किडा असल्यामुळे मीही ती ऑडिशन दिली आणि माझ्या बाबांना आणि निर्मात्यांना ती खूप आवडली. तिथून माझा अभिनय क्षेत्रातील प्रवास पुन्हा सुरू झाला.”