अभिनेते अजिंक्य देव हे दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांचे पूत्र होय. एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या जोडप्याला त्यांच्या मुलाने सिनेसृष्टीत येऊ नये, असं वाटत होतं. त्यांना अजिंक्य यांना अमेरिकेला पाठवायचं होतं, पण काही कारणांनी तसं झालं नाही आणि अजिंक्य इथेच रमले व पुढे अभिनेते झाले.
तुमच्या करिअरमध्ये आई-वडिलांचे कधी वाद झाले होते का? असा प्रश्न ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत अजिंक्य देव यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, “आई-वडील त्यांचे वाद बेडरुममध्ये करायचे, आमच्यासमोर कधीच ते भांडायचे नाहीत. मी अभिनेता व्हावं, अशी आईची फार इच्छा नव्हती. मी अमेरिकेला जात होतो, त्यामुळे मी जास्त शिकावं, असं कदाचित तिला वाटत असावं. कारण त्यावेळी मी पाहिलेली चित्रपटसृष्टी खूप अस्थिर होती. जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा थोडाफार बदल झाला होता.”
पुढे अजिंक्य देव म्हणाले, “त्या दोघांचे निश्चित वाद झाले असणार, परंतु नंतर तिलाही जाणवलं की माझा कल हळुहळू तिकडे जायला लागलाय. कारण मी अभ्यासात खूप हुशार होतो अशातली गोष्ट नव्हती. अमेरिकेला जायचं ठरलं होतं, कारण तेव्हा अमेरिकेला जाण्याचा जणुकाही ट्रेंड होता. १९८५-८६ च्या काळातली ही गोष्ट आहे. आता त्या मानाने भारत देश खूप चांगला आहे, पण त्याकाळी असं नव्हतं. मीही अमेरिकेला त्याच क्रेझमध्ये चाललेलो होतो.”
अमेरिकेला जायची तयारी बाबांनी कशी करून घेतली होती, त्याबाबत अजिंक्य देव यांनी आठवण सांगितली. “बाबांची प्रचंड इच्छा होती, त्यामुळे सर्जाच्या शुटिंगच्या आधीसुद्धा त्यांनी मला बोथाटी चालवायची ट्रेनिंग दिली होती. आमच्या टेरेसवर आजूबाजूचे लोक बघायचे की यांचं काय चाललंय. पण नंतर मात्र मला इथेच आवडू लागलं. मला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाला ७-८ पुरस्कार, सर्जाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर इथेच अभिनेता म्हणून काम करणं चालू झालं,” असं अजिंक्य देव यांनी सांगितलं.