गेले अनेक दिवस ‘बलोच’ या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाचं शूटिंग करणे हा या टीमसाठी थरारक अनुभव होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला एका खोलीमध्ये गावकऱ्यांनी डांबून ठेवले होते असा खुलासा या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणे याने केला आहे.
गेले काही दिवस ‘बलोच’ या चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत होती. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमोलने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना काय काय अडचणी आल्या हे सांगितले. तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही कारणांनी गावकरी त्यांच्यावर नाराज झाले आणि या संपूर्ण टीमला एका बंद खोलीमध्ये त्यांनी दोन दिवस डांबून ठेवले होते, असा खुलासा त्याने केला.
अमोल म्हणाला, “जैसलमेरमध्ये आम्ही राहायला होतो. जैसलमेर पासून ६०ते ७० किलोमीटर पुढे पाकिस्तान बॉर्डरवर खुर्जी म्हणून गाव आहे तिथे आम्ही शूटिंग करीत होतो. चार-पाच दिवस आमचे शूटिंग सुरू होते. प्रवीण सर तिथले शूटिंग संपायच्या एक दिवस आधीच मुंबईला गेले आणि दुसऱ्या दिवशी माझे, स्मिता मॅमचे आणि अशोक समर्थ सरांचे शूटिंग होते. ते शूटिंग सुरू असताना आमची टीम आणि तेथील स्थानिक प्रोडक्शन यांच्यात काही कारणाने वादावादी झाली. त्यांना आमचा इतका राग आला की त्यांनी आम्हाला तिथे कोंडून ठेवले.”
पुढे तो म्हणाला, “ते इतके रागावले होते की ते आम्हाला म्हणाले, ‘शूटिंग थांबवा आणि इथून निघा.’ आम्हाला अक्षरशः त्यांनी तिथे दोन दिवस कोंडून ठेवले. शेवटी आम्ही पुण्याच्या पोलीस कमिशनरांना फोन केला आणि त्यांना सगळे सांगितले. नंतर त्या पोलीस कमिशनरांनी जैसलमेरमधील कमिशनरांना फोन केला. त्यानंतर त्या गावकऱ्यांनी आमच्याकडे २ कोटींची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर इथून शूटिंग करून जायचे नाही, असे त्यांनी आम्हाला सांगितले. एका तांत्रिक गडबडीमुळे त्यांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आणि तो वाढत गेला. त्या दोन दिवसांमध्ये त्या गावकऱ्यांनी आमच्या गाड्यांच्या टायरची हवा काढली होती. अखेर त्यांनी मला, स्मिता मॅमला आणि अशोक समर्थ सरांना आम्ही प्रमुख कलाकार असल्याने गाडी दिली आणि तिथून निघण्याची परवानगी दिली. पण बाकी आमची संपूर्ण टीम मागे राहिली होती. त्या गावकऱ्यांनी टीमला जेवायलाही दिले नाही. अखेर आमचे निर्माते आणि पोलीस यांनी मिळून गावकऱ्यांची समजूत काढली आणि त्यांना ६० लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटवले.”