सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. शिवाय मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही उपस्थित होते. दरम्यान अशोक सराफ यांना मराठी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच विनोदी कथा लिहिणारे लेखकच आता नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अशोक सराफ म्हणाले, “सध्या मी चित्रपट करत नाही. कारण एखादी कथा मला लिहून देणारा कोणी लेखकच नाही. विनोदवीर म्हणून मला ओळखलं जातं. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त विनोदवीर आहे. पण इतरही भूमिका मी करू शकतो हे त्यांना माहित नाही. किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त विनोदवीर म्हणूनच माझा विचार करतात”.
आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”
“माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची विनोदी कथा लिहिणारा लेखक तरी कोण आहे?. माझ्या स्टाइलची कथा लिहिणार लेखक कोणीही नाही याचीच मला मोठी खंत वाटते. विनोदी कथा समोर का नाही येत? आणि जे विनोदी कथा लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे मी सध्या काही करत नाही. माझ्याकडे कथा येतात. पण मी वाचतो आणि त्यांना नकार कळवतो. कारण मला ते काम करावसं वाटत नाही”.
“मला जर ती कथा वाचून काम करावसं वाटेल तरच मी ते करणार. जी कथा मला पटत नाही ते काम मी करत नाही. जर कोणी चांगली कथा माझ्याकडे आणली तरच मी काम करेन. माझ्या वयाचा विनोद आताचे लेखक लिहू शकणार नाहीत. मला आता हिरो, हिरोच्या मित्राची भूमिका नाही मिळणार. फक्त आता मला वडिलांच्या भूमिका साकारायला मिळणार. आणि कुठला बाप कॉमेडी असतो? एक वेळ होती की, ज्यामध्ये वडील कॉमेडी दाखवायचे. पण आता तसं घडत नाही. मुळातच तसं लिहिणारं कोणी नाही. त्यामुळे काही होऊ शकत नाही”. अशोक सराफ सध्या नाटकामध्ये काम करत आहेत.