गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांवर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. याबद्दल विविध कलाकार त्यांची मत मांडताना दिसत आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकरने यावर स्पष्टपणे मत मांडले आहे. एका मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केले आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या प्रत्येक भूमिकेचे विशेष कौतुक केले जाते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात त्याने फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या भूमिकेचे फारच कौतुक केले जात आहे. लवकरच तो सनी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मय मांडलेकरने नुकतंच महाराष्ट्र टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबाबत मौन सोडले.
आणखी वाचा : “बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची रोखठोक भूमिका
यावेळी चिन्मय मांडेलकरला सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरुन विविध चित्रपट निर्मित केले जात आहे. यावरुन वाद पाहायला मिळत आहे त्यावर तुमचं मत काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चिन्मयने थेट प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. पण त्याने दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटाचे कौतुक केले.
“एखाद्या चित्रपटात काय योग्य काय अयोग्य याबद्दल आपण नको बोलूया. पण मला एकच कळतं की दिग्पाल लांजेकर नावाच्या दिग्दर्शकाने चार चित्रपट बनवले. एकदाही वाद झाला नाही. हेच माझं उत्तर”, असे चिन्मय मांडलेकर म्हणाला.
आणखी वाचा : Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”
दरम्यान दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते.
त्यानंतर शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या अष्टकातील पाचव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘सुभेदार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहिमेवर आधारित असल्याचे पाहायला मिळत आहे.