प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. व्यवसाय करण्यासाठी जमिनी विकलेल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होते याचं वास्तव ‘मुळशी पॅटर्न’मध्ये दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. अगदी बॉलीवूडमध्येही या चित्रपटाचा ‘अंतिम’ असा रिमेक बनवण्यात आला होता.
आजही ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळे प्रवीण तरडेंचे चाहते त्यांच्याकडे सतत लवकरात लवकर मुळशी पॅटर्न चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करा अशी मागणी करत होते. मध्यंतरी या लोकप्रिय दिग्दर्शकाने ‘धर्मवीर २’च्या नंतर ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न २’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा : Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक
दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता गश्मीर महाजनी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. गश्मीर इन्स्टाग्रामवर दर रविवारी ‘आस्क गॅश’ सेशन घेत असतो. या सेशनमध्ये गश्मीरने अनेकदा माझे आवडते दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत असं सांगितलं आहे. म्हणूनच नुकत्याच घेतलेल्या एका सेशनमध्ये एका चाहत्याने अभिनेत्याला ‘मुळशी पॅटर्न’बद्दल प्रश्न विचारला. “मुळशी पॅटर्न २ वर काही अपडेट?”, चाहत्याच्या प्रश्नावर “हो चित्रपट येईल पण थोडा वेळ लागेल…संयम ठेवा”, असं उत्तर अभिनेत्याने दिलं आहे.
हेही वाचा : लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात ओम भुतकर, देवेंद्र गायकवाड, उपेंद्र लिमये, मालविका गायकवाड, रमेश परदेशी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.