Gashmeer Mahajani on Chhaava Controversy: विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना लेझीम खेळताना दाखवण्यात आलं होतं. या नृत्याच्या दृश्यावर काही संघटनांनी आक्षेप घेतला. नंतर अनेक राजकीय नेत्यांनीही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि शेवटी या चित्रपटातून हे दृश्य वगळणार असल्याचं ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं. या वादावर अभिनेता गश्मीर महाजनीने प्रतिक्रिया दिली आहे. गश्मीर महाजनी व मृण्मयी देशपांडे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल’ला नुकतीच मुलाखत दिली. ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमात दुहेरी ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या गश्मीरला ‘छावा’ सिनेमाच्या वादाबद्दल विचारण्यात आलं. ‘छावा’ सिनेमाचा वाद सध्या सुरू आहे, अनेकदा ऐतिहासिक चित्रपट आले की कॉन्ट्रोव्हर्सी होते. तू स्वत: ऐतिहासिक भूमिका केल्या आहेस. या सगळ्याकडे तू कसं पाहतोस? असं गश्मीरला विचारण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गश्मीर उत्तर देत म्हणाला, “मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली, त्यावर एकही कॉन्ट्रोव्हर्सी झाली नाही. आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं होतं, कारण एकाच व्यक्तीने एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज अशी दुहेरी भूमिका करणं ही खूप मोठी रिस्क होती. यावर खूप मोठा वाद होऊ शकला असता, तरीही त्यावर प्रेक्षक किंवा समीक्षकांकडून एकही बोट उचललं गेलं नाही. उलट चित्रपटाचं मोठ्या मनाने स्वागत केलं. त्यामुळे त्या भूमिका करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. मी पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर नक्की चित्रपट करणार, यात वादच नाही. तो मराठीतच करणार, तो मराठीतच भव्यदिव्य व्हायला पाहिजे कारण त्या भाषेचं एक सौंदर्य असतं. चित्रपट दुसऱ्या भाषांमध्ये पण व्हावा, यात काहीच वाद नाही, कारण तो जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. मात्र सबटायटल्ससह एक ओरिजनल चित्रपट मराठी भाषेत झाला पाहिजे, कारण ती त्यांची भाषा होती.”

पाहा व्हिडीओ –

गश्मीरने येत्या ४-५ वर्षांत छत्रपती संभाजी महाराजांवरील भव्यदिव्य चित्रपट करणार, अशी माहिती दिली. गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘एक राधा एक मीरा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor gashmeer mahajani on chhaava controversy recalls doing double role of sambhaji maharaj and shivaji maharaj in marathi movie hrc