Jalna Lathi Charge : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकारणी मंडळी, सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींसह मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे या संदर्भात पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने या प्रकरणी ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे.
अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सिनेक्षेत्रातील त्याच्या कामासह अभिनेता अनेकदा सामाजिक आणि राजकिय परिस्थितीवर ट्वीट करत आपलं परखड मत मांडतो. आता हेमंतने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात झालेल्या लाठीचार्जबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, जुई गडकरीने शेअर केला पडद्यामागचा व्हिडीओ
“जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी…राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!” असं ट्वीट करत हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. जालना येथे २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. दोन वेळा झालेल्या चर्चेतूनही काही साध्य झालं नाही. पुढे पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर लाठीचार्जची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्याने आपलं मत मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.