‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस जोरदार चर्चा होती. अखेर हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. आता या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे आणि वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. वंदना गुप्ते यांच्या कामाचे केदार शिंदे चाहते आहेत. तर आता केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात वंदना गुप्ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. यानिमित्त केदार शिंदे हे वंदना गुप्ते यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करत वंदना गुप्ते यांच्याबद्दल भरभरून बोलले.
केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी कॉलेजमध्ये असेन तेव्हा, एक हाऊसफुल्ल नाटक, शिवाजी मंदिरात बाल्कनीतलं ब्लॅकचं तिकिट काढून पाहीलं होतं. अगदी शेवटच्या रांगेत तीचा आवाज आणि अभिनय याने भुरळ घातली होती. ते नाटक…’रंग उमलत्या मनाचे’. नंतर ‘चारचौघी’चा पडदा येण्याआधीचा फोन कट पाहीला, तेव्हा मध्यांतर होऊनही जागचा हललो नाही. इम्पॅक्ट काय असतो? ह्याची तिने शिकवण दिली. नकळत. मग पुढे फॅन म्हणून येणारं प्रत्येक नाटक तिच्या अभिनयासाठी पाहात गेलो. अभिनयातला क्रश होती ती!! दिसण्यात पण अफलातून तरीही ती DON आहे हे तिच्या अर्विभावात कळून चुकलं होतं.”
पुढे त्यांनी लिहिलं, “पुढे मी व्यावसायिक रंगभूमीवर काम सुरू केलं, तेव्हा आम्ही एकाच संस्थेत वेगवेगळी नाटकं करत होतो. तरी ती यायची आणि आवडलं तर शाब्बासकी किंवा नावडलं तर तोंडावर बोलून जायची. एकत्र नाटकातून काम करण्याचा योग कधी आला नाही. पण, ‘बाईपण भारी देवा’मधील शशी समोर येताच, हा उत्साहाचा धबधबा वंदू ताई दिसली. एका क्षणात तीने कामासाठी होकार दिला. या सिनेमाच्या निमित्ताने मी खुप जवळचा झालोय तीच्या!! तीच्या वयाचा प्रश्न बाजूला ठेवला तर, जवळजवळ ती माझी मैत्रीण झाली आहे. Best Friend… कारण तिचा स्वभाव. आपलसं करण्याचं कसब ! वंदू ताई जोवर माझ्या आयुष्यात आहे तोवर, हम झुकेगा नाही साला….. पुन्हा एकदा शाब्बासकीची वाट पाहतोय. आज रिलीजनंतर ती नक्कीच मिळेल… याची खात्री आहे.”