२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. सगळीकडे राम मंदिराचीच चर्चा आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अनेकांना देण्यात येत आहे. अशातच शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे, या बहिष्कारासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राममंदिर उद्घाटन सोहळा अनेक गोष्टींची पोलखोल करणारा ठरलाय यात शंका नाही.
जरा खोलात जाऊन सांगतो भावांनो.
ज्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनावर बहिष्कार टाकलाय… त्यातले एक शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज यांनी मागे उघडपणे सांगितले होते की, ‘मनुस्मृती हे जगातलं पहिलं आणि एकमेव संविधान आहे.’
ओके. ठीकै.
आता या बहिष्काराचं कारण शोधण्यासाठी मी मनुस्मृती वाचली. त्यातल्या काही नियमांकडं माझं लक्ष गेलं…
मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायात स्पष्टपणे सांगीतले आहे की, ‘धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे. त्याव्यतिरीक्त कुणी शुद्राने ते करू नये. शुद्राला ते सांगूही नयेत. अन्यथा नरक भोगावे लागते.’
मी विचार करू लागलो, हे तर कारण नसेल शंकराचार्यांच्या बहिष्काराचे???
दुसरं म्हणजे, पौष महिना म्हणे हिंदू धर्मात धार्मिक कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्या अंगाने पहायचं ठरवलं तर…
याच चौथ्या अध्यायात मनुने हे ही स्पष्ट सांगितले आहे की, ‘धार्मिक कार्यात डामडौल, दिखाऊपणा करणारे, मुहुर्ताचे बंधन न पाळणारे हे सर्व नरकवासाच्या शिक्षेला पात्र आहेत.’
हे ही कारण असेल कदाचित.
असो.
एकंदरीत राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून होत आहे, त्यामुळे ही नाराजी आहे, असे सध्या तरी वाटतेय.
नाही का? राजकीय फायद्यासाठी हे चाललंय असे धर्मगुरूंचे मत आहे.
आता तुम्ही म्हणाल ते आपापसात बघून घेतील, हे सगळं इस्कटून सांगायचं कारण काय? तर माझ्या भावाबहिणींनो, आता मनुवाद्यांचे हिंदुत्व आणि राजकिय हिंदुत्व यात उडालेली ठिणगी आपण बारकाईनं बघण्याची योग्य वेळ आहे… म्हणजेच वारकरी संप्रदायाने सांगीतलेला, छत्रपती शिवरायांनी जपलेला, प्रबोधनकार ठाकरेंनी उलगडलेला आपला खरा मानवतावादी हिंदू धर्म लखलखून उजळलेला दिसेल. मनुस्मृती जाळून बुद्धांच्या मार्गावर गेलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरही मनाच्या तळापासून कळतील आणि बुद्धीला पटतील…जय शिवराय जय भीम,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

किरण माने यांच्या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शविली आहे. अनेकांनी विरोधामागे हेच कारण असू शकतं, अशा कमेंट्स किरण मानेंच्या या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane post about shankaracharya ram mandir inauguration hrc
Show comments