आतापर्यंत अनेक मालिका, नाटके, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. त्यांच्या कामाबरोबरच ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील अनेकदा चर्चेत आलेत. काही महिन्यांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या सेटवर त्यांचा सहकलाकारांशी वाद झाला होता. त्यांच्यातील हा वाद हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. आता त्याचा उल्लेख करत किरण माने यांनी एक नवी पोस्ट लिहिली आहे.
किरण माने नुकतेच ‘रावरंभा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात ते ‘हकीमचाचा’ यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील त्यांचे एक पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं, “… त्यावेळी ही छोटी पण महत्त्वपूर्ण भुमिका माझ्यासाठी लाखमोलाचा आनंद देणारी ठरली होती. वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी माझ्या डोळ्यादेखत माझ्या ‘विलास पाटील’सारख्या दिलदार, दिलखुलास, रांगड्या व्यक्तीरेखेचा खून केला होता.”
पुढे ते म्हणाले, “मी सैरभैर झालो होतो. अन्यायाविरोधात पेटुन उठलो होतो. त्याचवेळी कुठूनतरी एखादा फ़रिश्ता यावा तसा हा ‘हकीमचाचा’ अलगद माझ्याजवळ आला. म्हणाला, “चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया…” चार दिवस हकीमचाचा माझ्या शरीरात वास्तव्याला होता… त्यानं नकळत कसली दवा दिली ख़ुदा जाने… माझा मेंदू, माझं मन एकदम शांत झालं.”
पुढे त्यांनी लिहिलं, “‘रावरंभा’ सिनेमात रावजी नांवाच्या अनोळखी मावळ्याची ‘अनसुनी दास्तान’ सांगीतलीय…याच मावळ्याला एका बिकट वळणावर हा हकीमचाचा भेटतो.. छत्रपती शिवरायांचा गुप्तहेर, बहिर्जी नाईकांचा चेला… तेज-नजर, जिगरबाज वृत्ती असलेला हकीमचाचा जणू काही रावजीलाही म्हणतो, “चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया.” आणि रावजीला त्याची जान ‘रंभा’ परत मिळवून देतो ! गेस्ट अपिअरन्स असूनही ही भुमिका कायम माझ्या काळजाच्या जवळ राहील. ज्या काळात मी या सिनेमाचं शुटिंग करत होतो त्याकाळात मी आयुष्यातली एक मोठ्ठी लढाई लढत होतो. त्यावेळी त्या लढाईसाठी वेगळंच बळ या चाचानं दिलं मला. नक्की बघा… ‘रावरंभा’ !” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.