अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे.

कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. तर अशातच त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटातील त्याचा लूक आता समोर आला आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील लूक समोर आला असून त्यात त्याच्या नजरेतून या व्यक्तिरेखेच्या क्रूरपणाचा अंदाज येत आहे.

हेही वाचा : Video: कुशल बद्रिके करत होता संजय जाधव यांची नक्कल, इतक्यात ते स्वतः आले अन्…

या भूमिकेबद्दल कुशल म्हणाला, “बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे.” हा चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader