मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांना पितृशोक झाला आहे. आज सकाळी त्यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. त्यांचं निधन झाल्याची माहिती नातसून उर्मिला कोठारेने दिली. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजोबांच्या निधनानंतर नातू व अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेने भावूक पोस्ट शेअर केली आहे. आदिनाथ व उर्मिलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंबर कोठारे यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली.  नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती.

प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येहीदेखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mahesh kother father ambar kothare passed away grandson adinath kothare shared emotional post kak