अभिनय, लेखन व दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात उत्तम करत अभिनेता प्रियदर्शन जाधवने मनोरंजनसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या हरहुन्नरी अभिनेत्याने फक्त याच क्षेत्रात नाही तर पत्रकारितेतही काम केलं आहे. याचा खुलासा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतून झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याबरोबर प्रियदर्शनने काम केलं आहे; याबाबत त्यानं स्वतः सांगितलं आहे.
‘राजश्री मराठी’ या एण्टरटेन्मेंट मीडियाला नुकतीच प्रियदर्शन जाधवने मुलाखत दिली. त्यावेळेस मुलाखदाराने विचारलं की, ‘तू एका न्यूज चॅनलमध्ये काम केलं होतं. त्यासाठी तू ‘चला जग जिंकू या’ अशी टॅगलाईन लिहिली होती. हे इंटरनेटवर कुठेच नाहीये?’ यावर प्रियदर्शन म्हणाला की, “माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या कोणाला माहित नाहीयेत. मी मुंबईत आल्यानंतर बासू भट्टाचार्य यांच्या मुलगा आदित्य भट्टाचार्य यांचा ‘दुबई रिटर्न’ नावाचा सिनेमा केला होता. ज्यामध्ये अभिनेते इरफान खान, दिव्या दत्त हे कलाकार होते. त्या चित्रपटात मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तसेच सागर बल्लारी नावाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी ‘कच्चा लिंबू’ नावाचा सिनेमा केला होता. त्यातही मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मी खूप वर्ष रामदास पाध्ये यांच्याबरोबर बोलक्या बाहुल्याचे शो करायचो. तसेच माइम क्लास घ्यायचो. मी वामा कम्युनिकेशन नावाच्या कंपनीत कामाला होतो. जिकडे नाटकाच्या जाहिराती पोहोचलवल्या जायच्या. तिथला महिन्याचा पगार ५०० रुपये होता. कारण मला घरून पैसे घ्यायचे नव्हते.”
हेही वाचा – फेक ऑडिशनच्या जाळ्यात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री; स्वत: खुलासा करत म्हणाली, “आतल्या खोलीत नेलं अन्…”
“२००८मध्ये न्यूज चॅनलसाठी मी काम करत होतो. माझं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं. ‘जागो मोहन प्यारे’ हे सुपरहिट सुरू होतं. नंतर मी ‘प्यार किया तो डराना क्या’ नाटक केलं. तेही खूप चांगलं चालू होतं. पण म्हणावे तसे पैसे नव्हते आणि म्हणावे तसे काम नव्हते. ते थोडे स्ट्रॅगलचे दिवस होते. थोडसं भरकटण्याचे दिवस होते, असंही म्हणता येईल. आयुष्यात मी खुपदा मुख्य प्रवाह सोडून असंख्य गोष्टीमध्ये भरकटलो आहे. आणि असा भरकटलो आहे की, जवळच्या लोकांनाचं माहितेय मी काय प्रमाणात भरकटलोय. तर ही भरकटण्याची ही एक स्टेज होती. मला असं वाटलं की, अभिनय, लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रात काही करता येणार नाही. त्यामुळे मी नाइलाजास्तव एका न्यूज चॅनलमध्ये नोकरी केली.”
हेही वाचा – अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्या १५ टिप्स; जरूर वाचा
पुढे प्रियदर्शन म्हणाला की, “पण एक नशीबाचा भाग असा होता की, ज्या न्यूज चॅनलला मी नोकरीला गेलो, तिथे मला निखिल वागळे सर भेटले. मी वर्षभर तिथे काम केलं. हळूहळू त्यांच्या बोलण्यातून किंवा एक-दोनदा त्यांनी मला हिंट दिली की, ‘तू इकडे नको थांबूस.’ मलाही ते पटलं. त्यांनी मला काही वाक्य ऐकवली आणि मला असं वाटलं, अरे हे केलंच पाहिजे. ते म्हणाले की, ‘तू एकतर पूर्ण प्रयत्नचं केला नाहीयेस. तू प्रयत्न करायच्या आधी सगळं सोडून देतोय. तर तू पूर्ण प्रयत्न कर.’ आणि दुसरं वाक्य ते असं म्हणाले की, ‘तू आता ज्या सीटवर बसला आहेस. ज्याला पत्रकार व्हायचं आहे, ज्याला पत्रकार म्हणून करिअर करायचं आहे. त्याची एक सीट तू उगीच अडवून बसला आहेस. जर तुला पत्रकार व्हायचं नसेल तर.’ मला असं वाटलं, हा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे. आपण कोणाची तरी एक सीट अडवतोय. म्हणून मी ती नोकरी सोडली. “
हेही वाचा – करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
दरम्यान, लवकर प्रियदर्शन जाधवचा ‘किर्रर्रर्र काटा किर्रर्रर्र’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे शूटिंग, एडिटिंग पूर्ण झाले आहे. जिओ स्टुडिओअंतर्गत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.