अभिनेता पुष्कर जोग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची सोशल मीडियावरील पोस्ट होय. राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीय सर्वेक्षण केले जात आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. पुष्कर जोगच्या घरीदेखील बीएमसीमधील महिला कर्मचारी गेली होती. त्या महिला कर्मचारीने जात विचारलेलं पुष्करला आवडलं नाही आणि यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुष्कर जोगच्या पोस्टमुळे चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर पुष्कर जोगवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली होती. तसेच अभिनेते किरण माने, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनीही त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता पुष्करने दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाला होता पुष्कर जोग?

“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट त्याने रविवारी केली होती.

पुष्कर जोगने रविवारी केलेली पोस्ट

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले…

पुष्करने पोस्ट शेअर करत व्यक्त केली दिलगिरी

“मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुष्कर जोगचं स्पष्टीकरण

दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘मुसाफिरा’ हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शनही पुष्कर जोगने केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor pushkar jog clarification on his post about bmc employees caste survey hrc
Show comments