कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी चित्रपट-मालिकांमधील भूमिकांमुळे, कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. काही दिवसांपासून कलावंत ढोल-ताशा पथक मोठ्या चर्चेत आहे. अभिनेता आस्ताद काळेने हे पथक सोडल्यानंतर याची मोठी चर्चा झाली होती. आता अभिनेता सौरभ गोखलेने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता सौरभ गोखलेने काही दिवसांपूर्वी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी कलावंत ढोल-ताशा पथकातील वादाबद्दल त्याने बोलताना म्हटले, “वाद असा नाही, पण कुठलाही आपण ग्रुप घेतला तर त्याच्यात मतभेद होत असतात. थोडेसे वाद असतातच. तसंच काहीसं आमच्यातही झालं. आम्हाला एक गोष्ट योग्य नाही वाटली, त्याला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत. फक्त त्याने जो निर्णय घेतला तो त्याला योग्य वाटत असला तरी आम्हाला टोकाचा वाटला. कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून ती सोडणं हा उपाय असू शकत नाही. पण ठीक आहे, तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही त्याचा आदर केला. दुर्देवाने ती सोशल मीडियावर आली आणि त्याची चर्चा झाली. पण, आम्ही कोणीच त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला माहितेय की ती अंतर्गत गोष्ट आहे.”

अभिनेता आस्ताद काळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलावंत पथक सोडल्याचे सांगितले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, “मी कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुकांसंबंधी मला संपर्क करू नये.”

सौरभ गोखले, आस्ताद काळे, अनुजा साठे, श्रुती मराठे या कलकारांनी एकत्र येत २०१४ साली या कलावंत ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. आस्ताद काळेने हे पथक सोडल्यानंतर याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: Video : “तू डबल ढोलकी आहेस”, निक्कीचं आता अभिजीतशी वाजलं; भांडणं पाहून अंकिता म्हणते, “दोघात तिसरा अन्…”

दरम्यान, कलाकारांमुळे इतर जे पथकातील सदस्य असतात त्यांना असुरक्षित वाटत नाही का? कारण सर्वांचे लक्ष कलाकारांवर केंद्रित असते. यावर बोलताना सौरभ गोखलेने म्हटले, “या पथकातील सर्वांना जास्तीत लोकांपर्यंत पोहचवता येईल, तसा आम्ही प्रयत्न करतो. कलावंतमध्ये सौरभ, अनुजा, सिद्धार्थ, श्रुती हे तर आहेतच पण इतरही आहेत, त्यामुळे आम्ही तसा प्रयत्न करतो. कलावंतच्या इन्स्टाग्राम पेजवर जरी पाहिलं, गेल्या दोन वर्षांत मोठा फरक हा जाणवेल की आमच्या कलाकारांच्या पोस्ट दिसणार नाहीत. कोणतंही रील उघडून पाहिलं तर आम्ही चार जण सोडून इतरांवर फोकस असतो.”

सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘अरुंधती’, ‘मांडला दोन घडींचा डाव’, ‘राधा ही बावरी’ अशा मालिकांमध्ये दिसला आहे. याबरोबरच ‘योद्धा’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘ तलाव’, ‘शिनमा’, ‘सर्कस’ अशा अनेक चित्रपटांत अभिनय करताना दिसला आहे.