सध्या बॉक्स ऑफिसवर चलती आहे ती दाक्षिणात्य चित्रपटांची, मागच्या वर्षी बॉलिवूड चित्रपटांना अपयश आले मात्र दाक्षिणात्य चित्रपट जसे की ‘पुष्पा’, ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’, ‘कांतारा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘विक्रम वेधा’, ‘सेल्फी’ यांसारखे बॉलिवूड चित्रपटदेखील दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक होते मात्र तरीदेखील ते चित्रपट चालले नाहीत. दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक करणं यात काहीच नावीन्य नाही. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेनी आता रिमेकवर भाष्य केलं आहे.

सयाजी शिंदे नाव फक्त मराठी चित्रपटसृष्टीपुरत मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी हिंदीप्रमाणे अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. सध्या ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची टीम पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे, टीमने प्रख्यात अशा श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेव्हा माध्यमांशी टीमने संवाद साधला. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले की “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कोणत्या गोष्टी मराठीमध्ये यायला हव्या जेणेकरून मराठी चित्रपटसृष्टी पुढे जाईल?” तेव्हा सयाजी शिंदे म्हणाले, “हा चित्रपट बघितल्यावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलादेखील कळेल की मराठी चित्रपटसृष्टीत कसे चांगले चित्रपट बनतात. ते पण म्हणतील आपण यांना कॉपी केलं पाहिजे. त्या तोडीचा हा चित्रपट आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“नवरी तयार…” ‘परश्या’च्या मुंडावळ्या बांधलेल्या फोटोवर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, आकाश ठोसर म्हणाला “वरात घेऊन…”

मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत नसून चक्क अभिनय करताना दिसत आहेत. हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सयाजी शिंदेच्याबरोबरीने नागराज मंजुळे व आकाश ठोसर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.