मराठी चित्रपटातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादा कोंडके यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना धडकी भरायची. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती आहे. यानिमित्ताने झी टॉकीजवर “ज्युबिली स्टार दादा” हा दादांच्या ६ सुपरहिट चित्रपटांचा सीझन ६ ऑगस्टपासून दर रविवारी सुरु होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते शक्ती कपूर यांनी एक खास आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दादा कोंडके यांचा चित्रपट एकदा थिएटरला लागला की तो किमान २५ आठवडे उतरायचा नाही हे समीकरणच होते. बॉलिवूडमधील नायकच नव्हे तर खलनायकही दादांच्या अभिनयावर फिदा होते. नुकतंच अभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
आणखी वाचा : “हे वय होतं का सोडून जायचं…”, किरण मानेंची भावुक पोस्ट, म्हणाले “नंतर कधीतरी याच हायवेवर…”

शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं. मीदेखील यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या चित्रपटात काम केलं. या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक् झालो.

दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता. आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते. आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं. त्यामुळे माझं मन तृप्त झालं, असे शक्ती कपूर यांनी सांगितले.

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ विवाहबद्ध? पतीचे नाव ते लग्नाची तारीख; सर्व माहिती आली समोर

“गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची, आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही. ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे. जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय. एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी सिनेसृष्टीला जे चित्रपट दिले ते कधीच जुने होणार नाहीत, इतका त्यात उत्साह आहे”, अशी आठवण शक्ती कपूर यांनी सांगितली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shakti kapoor shares special memory with dada kondke about income tax and farmhouse nrp
Show comments