झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या हर हर महादेव या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचे लूक समोर आले आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात मराठीतील हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर झळकणार आहे.
आणखी वाचा : मी भूमिका साकारावी ही छत्रपती शिवरायांची इच्छा होती : सुबोध भावे
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (१० ऑक्टोबर) सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्यूबवर अवघ्या काही तासांतच २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिकेबद्दल भाष्य केले.
यावेळी शरद केळकर म्हणाला, “माझ्या कारकिर्दीमधला हा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे असं मी मानतो. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. मी स्वतःला कायम छत्रपतींचा मावळा समजतो. त्यामुळे बाजीप्रभूंची ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या भूमिकेमुळे मला मराठी चित्रपटांमध्ये एक नवी ओळख मिळेल, असा विश्वास आहे.”
आणखी वाचा : “…पण शिवाजी पुन्हा होणे नाही” बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटाला तगडी टक्कर देणारा ‘हर हर महादेव’चा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकणार आहेत. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून प्रदर्शित होत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे.