महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात पसरली आहे. छत्रपतींचा इतिहास, त्यांचा पराक्रम आज सर्वांना ठाऊक आहे. आजवर त्यांच्यावर अनेक चित्रपट आले मात्र सध्या एकच चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘हर हर महादेव’, अभिजित देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात कलाकारांनी चित्रपट करताना आलेले अनुभव सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कलाकारांनी दिली.
पत्रकारांच्या प्रश्नावलीमध्ये एका पत्रकाराने शरद केळकरला प्रश्न विचारला ‘तू याआधी शिवाजी महाराज साकारला आहेस’, शरदने लगेचच त्या पत्रकाराला मध्येच थांबवले आणि सांगितले की ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणा’, तो पुढे म्हणाला ‘माफ करा मी तुम्हाला मध्ये थांबवत आहे पण हा चित्रपट आम्ही महाराजांचा होणारा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी चित्रपट बनवला आहे. यापुढे महाराजांचा एकेरी उल्लेख होऊ नये’. पत्रकाराने आपली चूक सुधारत चित्रपटाशी निगडित प्रश्न विचारला.
हर हर महादेव’ चित्रपटाच्या मानधनाबाबत सुबोध भावे म्हणाला, “भूमिकेसाठी मिळालेले पैसे…
महाराजांच्या एकेरी उल्लेख याआधीदेखील झाला आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटात शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटाच्या ट्रेलर सोहळ्यात अशाच एका पत्रकाराने महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता तेव्हा शरद केळकरने त्या पत्रकाराला त्याची चूक दाखवून दिली होती.
येत्या २५ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी हे कलाकार दिसणार आहेत. अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.