‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक महिला आणि पुरुष या चित्रपटाबद्दल गप्पा मारताना दिसत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षेंनी सुकन्या मोनेंच्या सासऱ्याची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्यांनी या चित्रपट बघताना नेमकी काय भावना होती याबाबतचा खुलासा केला आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, “बाईपण भारी देवा बघताना मी असंख्य वेळा रडलोय. छोट्या छोट्या गोष्टी बायकांनी मनात दडवून ठेवलेल्या असतात. त्या गोष्टी डबक्यासारख्या त्यांच्या मनात साचलेल्या असतात. या भावनांना प्रवाही करण्याचं मोठं काम या चित्रपटाने केलं आहे. हा चित्रपट नुसता करमणूकीसाठी नाही तर बायकांच्या भावनांना बाहेर काढण्याच काम या चित्रपटाने केलं आहे.”
हेही वाचा- Video : १०५ वर्षांच्या आजींनी पाहिला ‘बाईपण भारी देवा’, केदार शिंदे म्हणाले, “आजी रॉक्स…”
२०१९ मध्ये शरद पोक्षेंना कर्करोगाने ग्रासले होते. पोंक्षे या आजारपणातून नुकतेच बरे होतं होते तेव्हा केदार शिंदेंनी त्यांना फोन करुन हा चित्रपट ऑफर केला होता. केदार शिंदे म्हणालेले “लवकर बरा हो, तुझ्यासाठी एक भूमिका ठेवली आहे”, जेव्हा तुम्हाला एखादा दिग्दर्शक असं म्हणतो, तेव्हा हा विश्वास फार महत्त्वाचा असतो”, असे शरद पोंक्षे म्हणाले.
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ कमाईत सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? केदार शिंदेंनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले…
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. महिलांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाततीत या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या वेड चित्रपटालाही मागे टाकले आहे.