प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती, सामाजिक घडामोडी याविषयी आपली परखड मतं मांडत असतात. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं. या नाटकाचे प्रयोग २०१७ साली थांबवण्यात आले होते. आता ऑक्टोबरमध्ये हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर येणार आहे.
हेही वाचा : “तीन अंकी नाटक इथेच संपलं”, गौतमी देशपांडेच्या आजोबांचं निधन; ‘या’ मालिकेत केलं होतं एकत्र काम
शरद पोक्षेंना ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’या नाटकाच्यावेळी अनेक प्रसंगांना सामोर जावं लागलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी असाच एक प्रसंग सांगितला आहे. कायदेशीर लढा दिल्यावर या बहुचर्तित नाटकाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आणि १० जुलै १९९८ मध्ये पहिला प्रयोग पार पडला होता. याविषयी सांगताना शरद पोंक्षे म्हणतात, “सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावर १० जुलै १९९८ पासून आमच्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले आणि कोणीही विचार करू शकणार नाही असे अनुभव आम्हाला येऊ लागले. एखाद्या नटाने या नाट्यसृष्टीत ४० ते ५० वर्ष काम केल्यावर त्याला जे अनुभव येतात ते सगळे अनुभव मला या एकाच भूमिकेने दिले.”
हेही वाचा : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल
शरद पोंक्षे पुढे म्हणाले, “मला पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यापासून ते आमच्या नाटकाची संपूर्ण बस जाळण्यापर्यंत सगळं काही मी पाहिलं. एवढंच नव्हेतर रंगमंचावर नाटक सुरु असताना कॉंग्रेसचे ५० ते ६० लोक एकदम धडाधड वर यायचे आणि हे लोक मला घेराव घालून उभे राहायचे. असे अनेक अनुभव मला या नाटकामुळे आले. हे सगळे अनुभव घेत असताना रसिक प्रेक्षकांनी कधीच हाऊसफुलचा बोर्ड खाली उतरू दिला नाही.”
“महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मानलंच पाहिजे कारण, बाहेर शरद पोंक्षे मुर्दाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी की जय असं म्हणत असताना अशा परिस्थितीतून सुद्धा प्रेक्षक नाटक पाहायला येत होते आणि आमचे प्रयोग हाऊसफुल्ल होत होते. २० वर्षात ११०० प्रयोग झाले, पण आमचा एकही प्रयोग रिकामी गेला नाही…सगळे प्रयोग हाऊसफुल झाले. याशिवाय आम्ही एकही प्रयोग रद्द केला नाही. मी कधीच घाबरलो नाही…माझ्या चारही बाजूंनी लोक येऊन मला घेराव घालायचे. या सगळ्यात मी ताकदीने उभा राहिलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे राहिले होते.” असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
दरम्यान, सध्या शरद पोंक्षे ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी ‘बाईपण भारी देवा’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. लवकरच त्यांचे बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा रंगमंचावर पाहायला मिळणार आहे.