मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सध्या त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा हेमंत अनेकदा त्याच्या चित्रपटांसंबंधी अपडेट चाहत्यांशी शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. या चित्रपटाचे बरेच शो हाऊसफूल जात असूनही काही ठिकाणी तिकिटाचे पैसे परत करून शो कॅन्सल करण्याबद्दल हेमंतने सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे.
हेमंतची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही केवळ हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन देत मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय केला जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. हेमंतच्या या वक्तव्यावर चित्रपटसृष्टीतील कित्येकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनेही याबद्दल एक पोस्ट शेअर करत याबद्दल रोखठोक भूमिका घेतली आहे.
आणखी वाचा : “मी माझ्या पतीसाठी…” नीना गुप्ता यांचा मुलाखतीदरम्यान खुलासा
या सगळ्या प्रकाराबाबत मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं आहे असंही उत्कर्षने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. उत्कर्ष पोस्टमध्ये लिहितो, ” आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायचं असेल तर समानतेची वागणूक मिळायलाच हवी. अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके ह्यांच्या चित्रपटांना त्या काळी चित्रपटगृह मिळाली नव्हती, बहुदा मुदाम गळचेपीच मराठी चित्रपटाची करायचा मनसुबा काहींचा तेव्हा होता. तोच प्रश्न, तीच वेळ, तेच विचार, तीच कुचंबणा, तीच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढतीये. मराठी चित्रपट बनवताना किती कष्टाने सर्वजण आपलं सर्वकाही झोकून देत उत्तम चित्रपट तयार करायचा प्रयत्न करतायेत. पण अंततः प्रदर्शनास हक्काचे चित्रपटगृह, मुबलक वेळ, स्क्रीन्स महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना का दिली जात नाहीये?”
याबरोबरच उत्कर्षने एका लोकप्रिय म्हणीचा वापर करत मराठी कलाकारांनी एकजूट होऊन याबद्दल व्यक्त व्हायला हवं, विरोध करायला हवा असंही स्पष्ट केलं आहे. उत्कर्ष म्हणाला. “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” ह्या ओळी फक्त बोलण्यापुरत्या नसाव्यात, किमान एकमेकांसाठी उभे राहूया. एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटित होत आपले हक्क मिळवूयात.” मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी हा मुद्दा दरवेळी उपस्थित होतो. यावेळीही ‘सनी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.