‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटातील सहा अभिनेत्रींचं सर्वत्र कौतुक होत आहेत पण याचबरोबर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणारा सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता या चित्रपटात आईबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे त्याने सांगितलं आहे.
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. तर सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो सुचित्रा बांदेकर सकारात असलेल्या पल्लवी या व्यक्तिरेखेचा मुलगा दाखवला आहे. या चित्रपटामध्ये तो त्याच्या आईला म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांना व्हिडीओ कॉल करतो आणि त्याच्या एका परदेशी मैत्रिणीची ओळख त्यांना करून देतो असं दाखवलं गेलं आहे. त्या दोघांमधील हे दोन ते चार मिनिटांचं संभाषण सर्वांना आवडलं आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आईबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना सोहम म्हणाला, “माझा अनुभव खूप छान होता. कारण ज्या दिवशी मी शूटिंग केलं त्या दिवशी आई तिथे नव्हती. माझ्यात आणि आईमध्ये व्हिडीओ कॉल होताना दाखवला असल्याने मी ज्या दिवशी शूटिंग करत होतो त्या दिवशी आईच्या जागी दुसरीच व्यक्ती मला क्यू देत होती. आईने मला आधी विचारलं होतं की मी येऊ का सेटवर त्या दिवशी? पण मीच तिला म्हटलं की नको. कारण आपण कोणाबरोबरही काम करू शकतो पण आई-वडील समोर असले की थोडं दडपण येतं. त्यामुळे त्या दिवशी ती जाणूनबुजून सेटवर आली नव्हती.”
पुढे तो म्हणाला, “ती क्यू देणारी व्यक्ती मला खूप प्रेमाने घेऊ देत होती पण क्यू देताना आई जशी रिॲक्ट होईल तसा तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता. ज्या दिवशी मी पहिल्यांदा सेटवर गेलो तेव्हा या सहा जणी स्क्रिप्ट वाचत होत्या. त्यांच्या जशा भूमिका आहेत तसाच त्यांचा टेक होता आणि एक अभिनेता म्हणून मला हे खूप शिकण्यासारखं होतं.”