‘सुभेदार’ हा चित्रपट गेले अनेक महिने खूप चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पाडद्यावर पाहायला मिळणार आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात विराजस कुलकर्णीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच त्याची आई मृणाल कुलकर्णीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. तर आता त्याने त्याच्या आईच्या कामाबद्दल भाष्य केलं आहे.

या चित्रपटातून पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळी हे तिघंही एकाच चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी जिजाबाईंच्या भूमिकेत, शिवानी यशोदाबाई मालुसरे यांच्या भूमिकेत, तर विराजस या चित्रपटामध्ये हेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता विराजसने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आईच्या कामाबद्दलचं त्याचं मत व्यक्त करत त्यांचं भरभरून कौतुक केलं.

आणखी वाचा : “वर्षं पटापट निघून जातील आणि…” विराजस-शिवानीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवानिमित्त मृणाल कुलकर्णींनी केलेली पोस्ट चर्चेत

तो म्हणाला, “मला माझ्या कुटुंबामधून जितका ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तिला लाभला आहे. माझे पणजोबा गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर तिला गड किल्ले फिरण्याचा योग आला. दुर्दैवाने मी जन्माला येईपर्यंत त्यांचं फिरणं बंद झालं होतं. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटाचा विषय हा तिच्यासाठी दुसऱ्या एखाद्या चित्रपटासारखा कधीही नसतो. आपल्याला आता ते पात्र जमलं आहे आणि आता आपण करूया असा ती कधीच विचार करत नाही.”

हेही वाचा : “सुंदर शिवानीच्या शेजारी…”, विराजसचा बायकोसाठी हटके उखाणा, लेकाची कल्पकता पाहून मृणाल कुलकर्णीही थक्क

पुढे तो म्हणाला, “इतकी वर्ष जिजाबाईंची भूमिका साकारल्यावरही आज जेव्हा तिला पुन्हा तीच भूमिका साकाराची असते तेव्हा ती त्या स्क्रिप्टचा नव्याने अभ्यास करताना मी बघतो. तिच्याकडून एक पुस्तक वाचलं जातं किंवा जुनं पुस्तक नव्याने वाचलं जातं. खूप फोकस्ड राहून आई मला त्यावर काम करताना दिसते.” तर आता त्यांच्या या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.