प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची कायमच चर्चा पाहायला मिळते. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे ‘श्री शिवराज अष्टका’तील चित्रपट चांगलेच गाजले. या चित्रपटानंतर आता लवकरच सुभेदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेता विराजस कुलकर्णीने ‘श्री शिवराज अष्टका’तील पावनखिंड चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
विराजस कुलकर्णीने काल (२८ फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याने सुभेदार या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल भाष्य केले. त्यावेळी विराजसने मी ‘श्री शिवराज अष्टका’तील पावनखिंड चित्रपटात काम करणार होतो असा खुलासा केला. त्याचा पूर्ण किस्साही सांगितला.
आणखी वाचा : ‘शिवराज अष्टका’तील पाचव्या चित्रपटाची अखेर घोषणा, ‘या’ मोहिमेवर असणार आधारित
“मी ‘सुभेदार’ हा चित्रपट का करतोय? असा प्रश्न अनेकांनी मला विचारला होता. यामागे एक किस्सा आहे. जो अप्रत्यक्षरित्या ‘माझा होशील ना’ या मालिकेशी निगडीत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या शिवराज अष्टकातील चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे मला शाळेपासून ओळखतात. दिग्पाल लांजेकर हे मला शाळेत शिकवायला होते. दिग्पाल दादाने मला नाटकात काम कसं करायचं हे शिकवलंय. त्यामुळे मी खूप लहानपणापासून त्याच्याबरोबर काम केलं. त्यानेही मला अगदी लहानपणापासून त्याच्या नाटकात काम करताना पाहिलं आहे.
जेव्हा मी अभिनय क्षेत्रात नव्हतो. त्यावेळी त्याच्या दोन्हीही चित्रपटांचे सब टायटलिंग केलं आहे. त्यामुळे मी शिवराज अष्टकाशी जोडलेला होतो. त्यानंतर मी अभिनय करत असताना एका चित्रपटात अभिनय करावा, असं मी ठरवलं होतं. ‘शिवराज अष्टका’मधील ‘पावनखिंड’ या चित्रपटात मी काम करणार होतो. यातील एक पात्र मी साकारणार होतो. यासाठी मी दाढी, केस, मिशी वैगरे वाढवले होते.
पण त्याचवेळी नेमकं मालिकेची ऑडिशन झाली. त्यावेळी मला ‘माझा होशील ना’ ही मालिका मिळाली. त्यामुळे तिथून मला दिग्पाल दादाला फोन करावा लागला आणि त्याला हे सर्व सांगावं लागलं. मी फोन करुन ही मालिका करतोय, असं सांगितलं. यामुळे चित्रपटांच्या तारखांमध्ये गोंधळ होईल, असे मी त्याला सांगितले होते. त्यामुळे मी ‘पावनखिंड’ चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्याने मला खूप मनापासून पाठिंबा दिला होता. तू टेन्शन घेऊ नकोस, तू ती मालिका कर, खूप चांगली मालिका आहे, चांगली संधी आहे, असे त्याने मला सांगितले होते.
त्यामुळे तेव्हापासून त्याच्या एका चित्रपटात काम करणं राहिलं होतं. त्यानंतर आता इतक्या वर्षानंतर एकत्र काम करुन खूप धमाल आली. त्याच्या टीममधल्याबरोबर काम करुन मज्जा आली. हा अनुभव पुन्हा घरी परतण्यासारखाच होता. ‘सुभेदार’ चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला आवडेल की नाही, हे मला पाहायचं नाही”, असे विराजस कुलकर्णी म्हणाला.
आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा
दरम्यान दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्याबरोबरच ‘शेर शिवराज’ या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती.