लग्न झालेले प्रत्येक जोडपे गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत असते, पण एकाऐवजी अनेक गोड बातम्या मिळाल्या तर काय गोंधळ होईल, हे शब्दांत मांडणे कठीण. लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला आपल्याला एक किंवा दोन मुलं व्हावीत अशी इच्छा असते, पण एकाचवेळी जुळी, तिळी किंवा त्यापेक्षाही अधिक बाळांचा जन्म होणार असेल तर त्या जोडप्याच्या मनात आणि घरात काय दंगा होईल याची रंजक कथा वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार असून त्यात निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी या मुख्य जोडीबरोबर मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनवणे अशा दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक वरुण नार्वेकर, अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची संकल्पना कशी सुचली याबद्दल बोलताना यासाठी एका अर्थी समाजमाध्यमे जबाबदार असल्याचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी गमतीने सांगितले.

हेही वाचा >>> सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…

‘निपुणने एक व्हिडीओ पाहिला होता, ज्यात एका जोडप्याने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला होता. त्यातले एक बाळ हसायला लागले इतर तिन्ही बाळे हसायची. तो व्हिडीओ पाहत असताना आजच्या काळात जिथे एका बाळाला जन्म द्यायचा निर्णय घ्यायला वेळ लागतो, तिथे चार बाळांचे संगोपन कसे केले जाईल? हा विचार मनात आला. शिवाय, सध्या मुलांच्या संगोपनात पालक कमी पडतात. याबाबतीत पालकांबरोबर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग किती महत्त्वाचा असतो, यावरही चित्रपटातून भाष्य करण्याची संधी मी घेतली, असे वरुण नार्वेकर यांनी सांगितले.

दोन्ही व्यक्तिरेखा धाडसी

या चित्रपटातली समीर आणि सायली ही दोन्ही पात्रे फार धाडसी असल्याचे मत वैदेही परशुरामी हिने व्यक्त केले. ‘खूप उत्तमरीत्या या व्यक्तिरेखांचे लेखन करण्यात आले आहे. या व्यक्तिरेखांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य आनंदीपणे जगण्याचे ठरवले आहे. महाविद्यालयातील शिक्षण संपवून लगेचच ते एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतात. आणि लग्न झाल्या झाल्या त्यांना ही गोड बातमी समजते. अचानक मिळालेला हा धक्का असला तरी त्याकडेही ते सकारात्मकतेनेच पाहतात. त्यांचा हा दृष्टिकोन या चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे’, असे वैदेहीने सांगितले.

कलाकारांच्या पोस्ट पाहून या क्षेत्राचा मोह धरू नये… समाजमाध्यमे आणि त्यावर हिंदी-मराठी चित्रपट कलाकारांच्या पोस्ट पाहण्यात हरवलेल्या तरुणाईने त्या पोस्ट्स पाहून आपणही अभिनयाच्या क्षेत्रात येऊन काम करू शकतो, असा समज करून घेऊ नये. त्याऐवजी त्या कलाकारांनी घेतलेली मेहनत, त्यांचा आजवरचा या क्षेत्रातला संघर्ष, प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला वैदेहीने दिला. तर चित्रपटांमध्ये काम करताना आपले काम उत्तम होण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने योग्य ती मेहनत घेण्याची तयारी नवोदित कलाकारांनी ठेवायला हवी, असे आग्रही मत निपुणने व्यक्त केले.

निपुण आणि वैदेहीची जोडी

समीर आणि सायली या व्यक्तिरेखांसाठी निपुण – वैदेहीची झालेली निवड हा चित्रपटाचा आणखी एक आकर्षण बिंदू ठरला आहे. त्याविषयी बोलताना या चित्रपटासाठी थोडी वेगळी जोडी हवी होती, असे वरुणने सांगितले. ‘मला समीरच्या पात्रासाठी आखीव-रेखीव हिरो असलेला कलाकार नको होता. निर्णय घेताना भांबावून जाईल किंवा जो हळवा असेल असा अभिनेता मला या चित्रपटासाठी पाहिजे होता म्हणून निपुणची निवड आम्ही केली. वैदेही एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. तिच्याबरोबर काम करायची इच्छाही होती. माझ्या मते वैदेहीची आणखी उत्तम कामे प्रेक्षकांसमोर यायची आहेत. त्यामुळे सायली या व्यक्तिरेखेसाठी माझी पहिली आवड वैदेहीच होती. तिने देखील गोष्ट ऐकताच होकार कळवला आणि अशा पद्धतीने ही मुख्य जोडी जमून आली, असे त्याने सांगितले.

दहा वर्षांपूर्वी ही संकल्पना सुचली होती…

या चित्रपटाची संकल्पना १० वर्षांपूर्वी सुचली होती, असे निपुणने सांगितले. ज्यांना ज्यांना ही संकल्पना ऐकवली त्या सगळ्यांना पुढे काय झाले असेल याची उत्सुकता होती. असे खरोखरच घडले तर त्यावर ते जोडपे काय करेल? या विचारातून चित्रपटाची गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यावेळी वरुणसारखा उत्तम सहलेखक नाही हे लक्षात आले आणि मग त्याच्याबरोबर आम्ही हा चित्रपट पुढे न्यायचा ठरवले, असे निपुणने सांगितले.