ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कालाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विक्रम गोखले यांची माहेरची साडी या चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजली होती. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्री अलका कुबल यांनी याच चित्रपटातील एक आठवण सांगितली.
अभिनेत्री अलका कुबल आणि विक्रम गोखले यांनी ‘माहेरची साडी’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटात विक्रम गोखलेंनी अलका कुबल यांच्या वडीलांचे पात्र साकारले होते. हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता. त्याने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. नुकतंच सकाळ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी चित्रपटाच्या सेटवरची एक आठवण सांगितली.
आणखी वाचा : BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
“माहेरची साडी हा चित्रपट आम्हा दोघांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. कारण त्या चित्रपटात ते बाप आणि मी लेकीच्या भूमिकेत होतो. तेव्हापासून विक्रमजींनी कायम आपुलकीने जुळलेले नाते जपले. त्यावेळी आम्ही सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या वेळात शूटींग करायचो. त्या टीममध्ये विक्रमजी, आशालता ताई, उषा नाडकर्णी अशी दिग्गज मंडळी होती. तेव्हाही मनोरंजन विश्वात विक्रमजींचा प्रचंड दरारा होता. पण सेटवर मात्र ते तरुण मुलांशी, नवोदित कलाकारांशी एखाद्या मित्राप्रमाणे वागायचे. त्यांच्याशी प्रत्यक्ष आपुलकीने बोलायचे.
त्यांनी कधीही त्यांच्या वयाचा, कामाचा, अनुभवाचा गर्व केला नाही. ज्येष्ठत्व- श्रेष्ठत्व असूनही सेटवर त्यांचा वावर अगदी सहज असायचा. ते कुणाबरोबरही बसायचे, बोलायचे, इतकंच नव्हे तर मधल्या वेळेत आम्ही कॅरम खेळायचो, पत्ते खेळायचो. अगदी नाईट आउट, डान्स करणे, गाणी म्हणणे यातही विक्रमजी उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यामुळे त्यांचा वावर कायमच प्रत्येकाला हवाहवासा वाटायचा.
या वयातही कलाकारांची नवी पिढी घडवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मेहनत घेत होते. आताही त्यांच्या हातात माईक दिला तर ते अनुभवाचं मोठेपण बाजूला ठेवून निवेदनही करायला उठायचे. त्यांची ऊर्जा, सामाजिक काम करण्याची जिद्द, समाजाप्रती असलेली आस्था, असं खूप काही त्यांच्याकडून शिकता आलं. त्यामुळे विक्रमजी कायम स्मरणात राहतील”, अशी आठवण अलका कुबल यांनी सांगितली.
आणखी वाचा : दुखापतीमुळे अमोल कोल्हे सक्तीच्या विश्रांतीवर, तेजस्विनी पंडितने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
तर कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते.