‘माहेरची साडी’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होतं. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जवळपास सगळे रेकॉर्ड्स मोडत मराठी सिनेविश्वाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं. यामध्ये अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विजय चव्हाण, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘माहेरची साडी’ने अलका कुबल यांना घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली होती. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटादरम्यानचा एक खास किस्सा सांगितला आहे.
‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या आठवणी सांगताना अलका कुबल म्हणाल्या, “मी बहुतेक वेळा ही आठवण सांगत असते. कारण, ‘माहेरची साडी’मध्ये एका सीनसाठी मला तिरडीवर झोपायचं होतं. मला दिग्दर्शक विजय कोंडके यांनी या सीनबद्दल सर्व सांगितलं. ते म्हणाले, काही नाही ३ ते ४ तासात हा सीन संपेल. अजिंक्य, विक्रमजी यांचे काही डायलॉग असतील अशी सगळी कल्पना त्यांनी दिली.”
हेही वाचा : इंडस्ट्री सोडून अमेरिकेला जायचा निर्णय का घेतला? मृणाल दुसानिसने पहिल्यांदाच सांगितलं कारण; म्हणाली…
अलका कुबल पुढे म्हणाल्या, “पहिल्या दिवशी मी त्या सीनचा आनंद घेत होते. सगळ्यांकडे बघत होते आणि त्यादिवशी नेमका सूर्यप्रकाश नाहीसा होऊन सगळीकडे एकदम मळभ वातावरण आलं. त्यामुळे आमचे कॅमेरामन चारुदत्त म्हणाले होते की, आज हा सीन होऊ शकत नाही. अलका सॉरी तुला परत उद्या तिरडीवर झोपावं लागणार आहे. मी त्यांना म्हटलं काही नाही..मी खूप एन्जॉय केलं. पण, दुसऱ्या दिवशी तो सीन सुरू झाला आणि वेगळंच घडलं.”
“दुसऱ्यादिवशी मला त्या तिरडीवर अजिबात झोपता येईना. कारण, अबीर-गुलाल, आदल्या दिवशीची फुलं सगळं तसंच होतं. तेव्हा मला असं वाटलं अरे…मी माझं मरण माझ्याच डोळ्याने पाहतेय की काय…त्यामुळे त्या तिरडीवर मला दुसऱ्या दिवशी झोपवेना. पण, नंतर शूट सुरू झाल्यावर मी पटापट शूटिंग केलं.” असं अलका कुबल यांनी सांगितलं.
हेही वाचा : बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी गायकवाडने शेअर केला डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ! म्हणाली, “आईची भूमिका…”
दरम्यान, या बहुचर्चित ‘माहेरची साडी’ चित्रपटामुळे अलका कुबल यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. त्या महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. तेव्हा ‘माहेरची साडी’ चित्रपट गावच्या जत्रांमध्ये आवर्जुन दाखवला जायचा असंही अलका कुबल यांनी या मुलाखतीत सांगितलं.