गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली. त्यांना दोन मुली आहेत. पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. अलका कुबल यांनी नुकतीच त्यांची धाकटी मुलगी कस्तुरी हिच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला.
अलका कुबल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावरून त्या चाहत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी त्या चाहत्यांची शेअर करत असतात. काही वर्षांपूर्वीच त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली. आता ती वैमानिक म्हणून कार्यरत आहे. तर आता त्यांची धाकटी मुलगी कस्तुरीनेही मोठं यश संपादन केलं आहे.
आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करत होती. तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे. आता त्यांच्या मुलीला डॉक्टरची पदवी प्राप्त झाली आहे. अलका कुबल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून Dr. Kasturee Athalye. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला खूप शुभेच्छा.”
हेही वाचा : “माहेरची साडी चित्रपटावेळी आम्ही…” अलका कुबल यांनी सांगितली विक्रम गोखलेंची आठवण
आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते त्याचप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी कस्तुरीचं आणि आठल्ये कुटुंबीयांचं अभिनंदन करत आहेत.