लक्ष्मीकांत बेर्डेंचा ‘पछाडलेला’ हा चित्रपट त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर या चित्रपटात भरत जाधव, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, विजय गोखले, नीलम शिर्के यांसारखे कलाकार होते. त्याचबरोबर याच चित्रपटात श्रेयसची गर्लफ्रेंड, मनीषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने (Ashwini Kulkarni) साकारली होती. या चित्रपटामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अश्विनी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये कलाकार आणि त्यांच्या क्रेडिटविषयी भाष्य केलं आहे. अश्विनीने ‘द पोस्टमन’ या पॉडकास्टमध्ये याबद्दल असं म्हटलं की, “आजकाल असं बरेचदा होतं की, पोस्टरवर मुख्य कलाकाराचा चेहराच नसतो. किंवा एखादी मोठी भूमिका मी त्या चित्रपटात करत आहे आणि त्या चित्रपटाच्या पोस्टरवर माझा चेहरा नसावा. हे अजिबातच स्वीकार्य नाही”.
यापुढे तिने म्हटलं की, “हे लोक म्हणतात की, मी प्रसिद्धीसाठी काम केलं नाही, मी मानसिक समाधानासाठी काम केलं. पण असं काही नसतं. प्रत्येकाला दुखत असतं फक्त मी बोलते. साधी गोष्ट आहे की, मी आणि माझं काम लोकांनी बघावं यासाठीच मी या क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे मला माझ्या कामाचं श्रेय मिळालंच पाहिजे. साधी गोष्ट आहे की, त्या पोस्टरवर जर माझा चेहरा नसेल तर ते पोस्टर माझ्या वॉलवर नसेल”.
पुढे तिने वैभव जोशी यांचा उल्लेख् करत म्हटलं की, “एकदा वैभव दादा माझे खूप आवडीचे कवी आहेत. हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की तुम्ही आमच्याकडून गाणी लिहून घेता आणि त्या पोस्टरवर माझं नाव नसेल तर ते अन्यायकारकच आहे. एका प्रोजेक्टसाठी सगळ्यांनीच मेहनत केलेली असते, माझं असं म्हणणंच नाही की मी एखादा कॅमिओ आणि माझा फोटो पोस्टरवर असावा. पण मी त्या कलाकृतीचा एक सशक्त भाग आहे तर माझी सशक्तता दिसली पाहिजे”.
दरम्यान, अश्विनी ‘सख्या रे’ या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती ‘विठ्ठल माझा सोबती’, ‘घे डबल’ ‘फुलराणी’, ‘८ दोन ७५’, ‘गुगल आई’ यातही झळकली आहे. शिवाय ‘नाय वरण भात लोणचं, कोण नाय कोणचं’ या चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच चर्चेत आली होती.