सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर आता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.
शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात दिग्दर्शन, संवाद, गाणी कलाकारांचा अभिनय या सगळ्याचंच प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.
या चित्रपटात अश्विनीने शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नी राधाबाई साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा केदार शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटो अश्विनीने पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “महाराष्ट्र शाहीर” हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.. लोककला, लोकगीतं यांचा अनुभव घ्या…. ‘माई’ साकारल्या ते पूर्णपणे दिग्दर्शक केदार सर यांनी जे सांगितले त्यानुसार… त्यामुळे मी केदार सरांची कायम ऋणी राहीन.” तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिथे चाहते या चित्रपटातील तिचं काम आवडल्याचं सांगत आहेत. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील या पोस्टवर रेड हार्ट देत कमेंट केली.
अंकुश चौधरी, अश्विनी महांगडे यांच्याबरोबरच केदार शिंदे यांची लेक सना शिंदे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनेत्री म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.