मराठी व हिंदी सिनेमांमध्ये आजवर आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांच्या नावाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे यंदा त्यांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आणि त्यांच्या चित्रपटाला याठिकाणी मानाचा पुरस्कारही मिळाला. यावेळी त्या चित्रपटाच्या टीमबरोबर रेड कार्पेटवर डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. डान्स करण्यामागची भावना छाया कदम यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ‘कान’मध्ये पुरस्कार मिळाला. ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘कान’मध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या छाया कदम यांनी रेड कार्पेटवर डान्स केला होता. त्या डान्सबद्दल कोणीतरी मस्करीत टिप्पणी केली आणि त्याला आपण उत्तर दिलं, असं छाया ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाल्या. चित्रपटाच्या दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनी चित्रपटातील कलाकार छाया कदम, कनी कुसृती आणि दिव्या प्रभा यांच्याबरोबर रेड कार्पेटवर स्टायलिश वॉक केला आणि उपस्थितांची मनं जिंकली.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

रेड कार्पेटवर डान्स करण्याची कल्पना कोणाची होती, असं विचारल्यावर छाया कदम म्हणाल्या, “मी नक्की सांगू शकत नाही, पण ती व्यक्ती कदाचित मीच होते. मुंबईतील कोणीतरी विनोद केला की ‘तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात असल्यासारखं नाचत होत्या.’ ‘का नाही?’ असं म्हणत मी त्याला उत्तर दिलं. ३० वर्षांनंतर एका मुख्य स्पर्धेचा भाग होणं आणि पुरस्कार जिंकणं ही खूप मोठी कामगिरी आहे. अशा वेळी नियमांचं पालन का करायचं? आम्ही मनसोक्त डान्स करून आनंद व्यक्त केला.”

“मन भरून आलं…”, Cannes मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या…

छाया यांच्या मते, ‘कान’च्या रेड कार्पेटवरील त्यांनी केलेला डान्स हा सेलिब्रेशनचा एक क्षण होता. “आम्ही फोटोंसाठी थांबलो, तेव्हाही फोटोग्राफर्सनी आम्हाला नाचत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ही एक खूपच जास्त आनंदाची भावना होती. या महोत्सवात चित्रपटाला चांगलं यश मिळेल, असे संकेत जणू त्यातून मिळत होते,” असं त्यांनी नमूद केलं. त्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येताना ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं वाजत होतं, असा उल्लेख त्यांनी केला.

OTT वर मागच्या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेल्या ‘या’ पाच वेब सीरिज, तुम्ही बघितल्यात का? वाचा नावं

दरम्यान, छाया कदम यांचं सध्या हिंदी व मराठीच नाही तर दाक्षिणात्य कलाकारही कौतुक करत आहेत. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मिळालेल्या यशानंतर संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress chhaya kadam reply someone who commented on her dancing at cannes red carpet check details hrc