एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांची चौकशी सुरु आहे. समीर वानखेडेंची पत्नी व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने याबाबत एक पोस्ट केली आहे.
क्रांती रेडकर समीर वानखेडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासूनच क्रांती सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसत आहे. आता क्रांतीने लोकमान्य टिळक यांचे एक उदाहरण देत यावर टीका केली आहे.
आणखी वाचा : “देशाची सेवा करण्यासाठी…”, समीर वानखेडेंचा व्हिडीओ शेअर करत क्रांती रेडकरची पोस्ट, म्हणाली…
या व्हिडीओत क्रांती रेडकर म्हणाली, “मित्रांनो आज मी तुम्हाला आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे. मी हिंदी यासाठी सांगतेय, कारण माझ्या मराठी बांधवांना ही गोष्ट आधीच माहिती आहे. मराठी घराघरात लहानपणापासून ही गोष्ट ऐकवली जाते.
त्यावेळी असं घडलं होतं की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जेव्हा शाळेत होते, त्यावेळी त्यांच्या काही मित्रांनी शेंगा खाल्ल्या होत्या आणि त्याचे टरफल वर्गात फेकल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण वर्ग घाण झाला होता. यानंतर त्यांचे शिक्षक वर्गात येऊन सर्व मुलांना ओरडले आणि आताच्या आता ही टरफल उचला अशी शिक्षा त्यांना दिली. मात्र त्यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उठले आणि म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही.
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं फार गरजेचे आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त अपराधी असतो. देशाची जी न्यायप्रक्रिया खूप शक्तीशाली आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा आधार घ्या आणि जर तुम्ही खरे असाल तर ते नक्कीच तुमच्या बाजूने उभी राहिल. त्यामुळे अन्याय सहन करु नका. अन्यायच्या विरोधात नक्कीच आवाज उठवा”, असे क्रांती रेडकरने या व्हिडीओत म्हटले आहे.
“मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, आदरणीय लोकमान्य बाळगंगाधर टिळक”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकरशी २०१७ साली लग्न केलं. क्रांतीबरोबरचा हा त्यांचा दुसरा विवाह आहे. क्रांती व समीर वानखेडे यांना दोन जुळ्या मुली आहेत.