केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’ चित्रपटाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २००६ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झालेली असली, तरी तितक्याच आवडीनं आजही ‘जत्रा’ चित्रपट पाहिला जातो. चित्रपटातील मोन्या, सिद्धू, कुश्या, राजू, संज्या, शेवंता, अक्का अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील गाण्यांनी तर त्यावेळी अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं होतं. ‘ये मैना’ गाणं असो किंवा ‘कोंबडी पळाली’ कुठलाही कार्यक्रम असो, ही गाणी वाजवली जातात. आजही या गाण्यावर प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकरने ‘जत्रा’ चित्रपटाविषयीच्या काही रंजक गोष्टी एका मुलाखतीमध्ये सांगितल्या.
‘जत्रा’ चित्रपटातील शेवंता या भूमिकेसाठी पहिली पसंती क्रांती रेडकर नव्हती तर दुसरीच अभिनेत्री होती. या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी अंकुश चौधरीने सांभाळली होती. तसंच ‘कोंबडी पळाली’ पूर्ण गाण्यात क्रांती रेडकर का नव्हती? अशा बऱ्याच पडद्यामागच्या गोष्टींचा तिने खुलासा केला होता. त्याचं गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
केदार शिंदेंनी ‘जत्रा’साठी क्रांती ऐवजी विचारलं होतं ‘या’ अभिनेत्रीला
कांचन अधिकारी यांच्या युट्यूब चॅनलवरील ‘बातों बातों में’ या कार्यक्रमात अभिनेत्री क्रांती रेडकर सहभागी झाली होती. त्यावेळी तिने ‘जत्रा’ चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ‘जत्रा’ चित्रपटात शेवंताच्या भूमिकेसाठी तिच्या आधी अभिनेत्री अदिती सारंगधरला विचारण्यात आलं होतं. पण अदितीने नकार दिला आणि मग ती संधी क्रांतीकडे चालून आली. मग काय! क्रांतीने या संधीचं सोनं केलं. क्रांती याबाबत सांगताना म्हणाली, “केदार शिंदे माझ्या खूप जवळचा माणूस आहे. त्यानं माझं पहिलं नाटक केलं. पहिली एकांकिका केली. पण तरी ‘जत्रा’ चित्रपटासाठी केदार शिंदेच्या डोक्यात मी अशी पटकन आले नाही? अभिनेत्री अदिती सारंगधरला माझ्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण त्यावेळेला तिचं काही जमलं नाही.
तिला माझी भूमिका नव्हती करायची तिला अक्कासाहेबची भूमिका अधिक आवडली होती. पण अक्कासाहेबांच्या भूमिकेसाठी प्रिया बेर्डेंना आधीच विचारण्यात आलं होतं. केदारची खूप इच्छा होती की, अक्कासाहेबांची भूमिका प्रिया बेर्डेंनीच करावी. त्यामुळे त्यांनी तसं अदितीला सांगितलं. त्यावेळेस अदितीची ‘वादळवाट’ मालिका खूप हिट झाली होती. त्यामुळे अदितीची लोकप्रियता वाढली होती. पण काही कारणास्तत्व तिने ‘जत्रा’ चित्रपटासाठी नकार दिला. मग मला केदारने विचारलं चित्रपट करशील का? केदारचा फोन असल्यामुळे काय भूमिका? काय आहे? हे विचारलंच नाही. करते म्हणून थेट सांगितलं. भारती मावशीने (भारती आचरेकर) केदारला सुचवलेलं की, आपल्या वेड्या मुलीला विचार, ती करणार. मग तेव्हा केदार म्हणाला अरे क्रांतीचं नाव डोक्यातच नाही आलं. अशाप्रकारे मी ‘जत्रा’ चित्रपट केला.
हेही वाचा – नव्या घराच्या नेमप्लेटवर का नाही रुपाली भोसलेचं नाव? अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली, “माझं कायम…”
‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान क्रांतीच्या कॉस्च्युममुळे झाला घोळ
आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात गायलेलं आणि अजय- अतुलने संगीतबद्ध केलेलं ‘कोंबडी पळाली’ गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतं. अशा या सुपरहिट गाण्यांचं चित्रिकरण करताना मात्र एक घोळ झाला होता. गाण्यातील क्रांती रेडकरचा कॉस्च्युमच उशीरा आला. त्यामुळे ‘कोंबडी पळाली’ गाण्यामध्ये क्रांती कमी वेळा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे क्रांतीच्या गाण्यातील कॉस्च्युमचं डिझाइन अंकुश चौधरीने केलं होतं. याबाबत अभिनेत्री म्हणाली, “‘कोंबडी पळाली’ गाण्यात थोडा दाक्षिणात्य पॅटर्नचा नाच करायचा होता आणि माझा लाउडी बाज आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा जेव्हा मी गाणं ऐकलं होतं तेव्हा मला काहीच कळालं नव्हतं. मी तालमीला पोहोचले त्यांनी मला गाणं ऐकवलं. नुसतं धडधड वाजत होतं. मी म्हटलं, एक मिनिट, हे किती फास्ट गाणं आहे. मग त्या गाण्याच्या डान्सची तालीम झाली. उमेश जाधवने दोन दिवस तालीम घेतली आणि मग ज्या दिवशी चित्रिकरण होतं, त्यादिवशी माझ्या गाण्यातला कॉस्च्युम नीट आलाच नव्हता.”
पुढे क्रांती म्हणाली, “गाण्याचं चित्रिकरण चालू झालं होतं. दोन वाजेपर्यंत कॉस्च्युमच्या प्रॉब्लेममुळे सेटवर पोहोचले नव्हते आणि मी मेकअप रुममध्ये रडत होते. मला इतकं नाचायचं होतं, इतकं ते करायचं होतं. काहीतरी त्या कॉस्च्युमचा प्रॉब्लेम झाला होता. बरं, अंकुश चौधरी ‘जत्रा’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक होता. अंकुशने तो कॉस्च्युम डिझाइन केला होता. नंतर आम्ही त्याला खूप झापलं होतं. याला काय अर्थ आहे? कोंबडीच्या गाण्याला नागिणचा ड्रेस? पूर्ण कॉस्च्युम काळ्या रंगाचा का… वगैरे? त्याने मला तेव्हाच सांगितलं, नंतर हेच कपडे घालून लोक याच गाण्यावर परफॉर्म करणार शाळा आणि कॉलेजमध्ये… तू बघच. आणि तेच घडलं.”
हेही वाचा – “दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज…”, क्षितिज पटवर्धनने राहुल द्रविडसाठी लिहिलेल्या खास पोस्टने वेधलं लक्ष
“जेव्हा ती गडबड झाली तेव्हा मी खूप रडायला लागले होते. तेव्हा अंकुश म्हणाला, काही नाही होणार. तुझा कॉस्च्युम येणार. तू शांत हो. तुझं छान होणार वगैरे. पण कॉस्च्युममुळे मी गाण्याच्या काही भागात दिसली नाही. परंतु यावेळी अंकुशने सगळी परिस्थिती हाताळली, तो खूप गोड मनाचा माणूस आहे. माझा कॉस्च्युम २ वाजता आला,” असा किस्सा क्रांतीने सांगितला. दरम्यान, ‘जत्रा’ चित्रपटात क्रांती रेडेकर व्यतिरिक्त अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, विजय चव्हाण, उपेंद्र लिमये, विजू खोटे, किशोर चौघुले, जयंत भालेकर, संजय खापरे, सुनील तावडे असे अनेक तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत.