अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या दोघेही एका त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. सिद्धार्थ-मितालीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. दुसऱ्या लग्नासाठी सिद्धार्थने आपल्या आईला आणि मितालीने लाडक्या सासूबाईंना खंबीरपणे पाठिंबा दिला. नुकतीच दोघांनीही सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता मितालीने या लग्नसोहळ्यातील भावुक क्षण इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.
मितालीने यापूर्वी सासूबाईंच्या लग्नातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सासूच्या लग्नसोहळ्यातील जोडवी घालताना क्षण मितालीने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. दोघींच्या गोड नात्याची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
सीमा चांदेकर या व्हिडीओमध्ये मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात जोडवी घातली होती…आज ती माझ्या पायात जोडवी घालणार असं बोलताना दिसत आहेत. सासूच्या पायात जोडवी घालताना मिताली भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ‘किती गोड’, ‘सुंदर’, ‘अशी सूनबाई सर्वांना मिळावी’ अशा कमेंट्स अभिनेत्रीचं कौतुक करत केल्या आहेत.
मिताली मयेकरने या व्हिडीओला “माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण” असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत मितालीने त्यांना खंबीरपणे साथ दिली होती. “आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.” असं अभिनेत्रीने म्हटलं होतं. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.