कलाविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून मृणाल कुलकर्णींना ओळखलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. गेली अनेक वर्षे त्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकाने काही वर्षांपूर्वीच इंडस्ट्रीत पदार्पण केलं. अल्पावधीतच विराजस घराघरांत लोकप्रिय झाला आहे. आज लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी खाल पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण, विराजसचा खरा वाढदिवस आज नसतो…तरीही त्याला शुभेच्छा देण्यामागे एक खास कारण आहे.

‘माझा होशील ना’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून विराजस कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने ‘आदित्य’ ही प्रमुख भूमिका साकारली होती. ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे विराजसला एक वेगळी ओळख मिळाली. आता त्याच्या आईने म्हणजे मृणाल कुलकर्णी यांनी त्याच्यासाठी काय पोस्ट लिहिलीये जाणून घेऊयात…

विराजसबरोबरचे बालपणीचे फोटो शेअर करत मृणाल कुलकर्णी लिहितात, “तो प्रवास सुंदर होता..हा प्रवास सुंदर आहे. आज खरा जन्मदिवस नाहीये पण, तरीही शुभचिंतन. कष्ट करा ! यशस्वी व्हा ! आनंदी रहा ! कारण विराजसचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला असतो.” लीप वर्षात जन्म झाल्याने दर ४ वर्षांनी विराजस आपला वाढदिवस साजरा करतो. यामुळेच मृणाल कुलकर्णी यांनी कॅप्शनमध्ये “आज तुझा खरा वाढदिवस नाहीये” असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘माझा होशील ना’ मालिकेत काम केल्यावर सध्या अभिनेता पुन्हा एकदा नाटकामध्ये रमला आहे. काही महिन्यांपूर्वी विराजस ‘गालिब’ या नाटकात काम करत होता. त्याच्या सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सखी गोखले व सुव्रत जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वरवरचे वधूवर’ या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन विराजस कुलकर्णीने केलेलं आहे. याबद्दल त्याचा नुकताच ‘झी नाट्य गौरव’ अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला आहे.

विराजसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्याने २०२२ मध्ये शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानीची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. शिवानी रांगोळे सध्या ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

Story img Loader