मनमोकळा स्वभाव, उत्तम अभिनय, स्वत:च्या फिटनेसची काळजी घेणारी आणि नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट. आजच्या घडीला प्रियाचा फिटनेस पाहता ती आता ३६ वर्षांची झाली आहे यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रिया बापटचं संपूर्ण बालपण दादरच्या चाळीत गेलं. बालमोहन शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यावर, पुढे या सामान्य कुटुंबातील मुलीने महाविद्यालयात असतानाच थेट बॉलीवूडपर्यंत मजल मारली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात प्रियाने साकारलेल्या निरागस मुलीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शबाना आझमी : समांतर सिनेमांची ‘गॉडमदर!’

बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर अगदी लहान वयात काम करून सुद्धा प्रियाच्या वागण्याबोलण्यात कधीच मोठेपणा जाणवत नाही. “आयुष्यात विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो” असं प्रियाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याच प्रेरणेतून अभिनेत्रीने नाटक, चित्रपट, वेबसीरिज, मालिका अशा चारही क्षेत्रांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला.

‘दादर’ म्हणजे प्रेम…

“दादर म्हणजे माझं प्रेम” असं प्रिया कायम बोलत असते. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या पर्वाच्यावेळी प्रियाने तिच्या राहत्या घराबद्दल आणि दादर शहराबद्दल भावनिक पोस्ट शेअर करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. “घर, जिथे आपली स्वप्नं फुलतात…मी नशीबवान आहे म्हणून या शहरात माझा जन्म झाला. दादरच्या एका चाळीत मी लहानाची मोठी झाले…आणि आज देशभरातून मला एवढे प्रेम मिळत आहे. या जागेने, शहराने मला सर्वकाही दिले. मी कायम ऋणी असेन” अशी पोस्ट शेअर करत प्रियाने तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली होती. यावरून दादर आणि प्रियाचं किती घट्ट नातं आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो.

राजकुमार हिरानींना कोणत्या नावाने हाक मारू? प्रियाचा उडालेला गोंधळ

प्रियाने कॉलेजमध्ये असताना ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा ती बालकलाकार म्हणून काम करत असल्याने एवढ्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शकाला कोणत्या नावाने हाक मारू? यावरून प्रियाचा गोंधळ उडाला होता. जेव्हा अभिनेत्रीने त्यांना “मी तुम्हाला अंकल बोलू का?” असं विचारलं होतं तेव्हा राजकुमार हिरानी यांनी, “मला तू राजू म्हणून हाक मार…”असं प्रियाला सांगितलं होतं.

हेही वाचा : Video: अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “दादा एक…”

राजकुमार हिरानींचं प्रियाने कर्ली टेल्सच्या मुलाखतीत प्रचंड कौतुक केलं होतं. प्रिया जुन्या आठवणींना उजाळा देत सांगते, “राजू सर खूप चांगले आहेत. एक दिग्दर्शक कलाकाराला घडवत असतो यावर माझा विश्वास आहे. माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप पाहून त्यांनी पहिल्याच दिवशी हा ‘मेकअप का केलास? चेहरा धुवून टाक’ असं सांगितले होतं. जशी आहे तशीच छान वाटतेस, असं सांगून राजू सरांनी मला डायलॉग कसे बोलावेत याविषयी मार्गदर्शन केलं होतं. ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटातील एकाही सीनसाठी मी मेकअप केला नव्हता, ते दिवस फार सुंदर होते.”

पुन्हा नाटकाकडे वळण्याचं एकमेव कारण म्हणजे उमेश…

पडद्यापलीकडच्या वैयक्तिक आयुष्यात प्रियाने २०११ मध्ये लोकप्रिय अभिनेता उमेश कामतसह लग्न केलं. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर उमेश-प्रियाने वैवाहिक जीवनाची घडी बसवली. दोघांनी एकत्र अनेक मालिका, चित्रपट, सीरिज आणि नाटकात काम केलंय. त्यांच्या ‘नवा गडी नवं राज्य’ नाटकाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. ‘नवा गडी…’ हे नाटक यशस्वी ठरल्यावर तब्बल १० वर्षांनी उमेश-प्रिया रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाच्या रुपाने एकत्र आले. १० वर्षांनी एखाद्या नाटकात पुनरागमन करणं ही कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट असते. पण, केवळ नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं असं प्रिया अभिमानाने सांगते.

प्रिया नवऱ्याचं कौतुक करताना सांगते, “उमेश एक कलाकार म्हणून माझ्याशी काय-काय शेअर करतो याबद्दल मला खरंच कल्पना नाही. पण, नाटकातील सहकलाकाराआधी तो माझा नवरा आहे. त्यामुळे ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याबरोबर शेअर करते. आज एवढ्या सहजपणे मी पुन्हा नाटक करण्याचा विचार केला त्याचं एकमेव कारण म्हणजे उमेश कामत. जर या नाटकामध्ये उमेश नसता तर, मी पुन्हा नाटकाकडे वळले असते का हे खरंच माहिती नाही.”

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ ते ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ विविध भूमिकांमधून घडताना…

शशिकला भोसले ते पूर्णिमा गायकवाड प्रियाने नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यासाठी प्राधान्य दिलं आहे. आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा नवी भूमिका वेगळी आणि हटके असावी यासाठी प्रिया सतत प्रयत्न करते. याबद्दल प्रिया लोकसत्ताशी संवाद साधताना म्हणाली होती, “दिग्दर्शक नागेश कुन्नूर यांच्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती. त्यामुळे मी पूर्णिमा गायकवाडच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. कोणत्याही भूमिकेची निवड करताना मी सातत्याने प्रयत्न करते की, माझ्या आधीच्या कामापेक्षा नवी भूमिका ही वेगळी असेल. ‘काकस्पर्श’पासून ते ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’पर्यंत… मी प्रत्येक वेळी विविध प्रकारच्या भूमिका करण्याला प्राधान्य दिलंय.”

हेही वाचा : “कामातून थोडा वेळ काढा आणि…”; नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला शाहरुख खानने दिला सल्ला

‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील व्हायरल झालेल्या इंटिमेट सीनमुळे काही वर्षांपूर्वी प्रियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. काही जणांनी तिने केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी असे सीन्स केले असा आरोप केला होता. अशा कठीण प्रसंगात सुद्धा अभिनेत्रीने ठामपणे स्वत:ची बाजू मांडली होती. “अभिनय क्षेत्र आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. मी अभिनेत्री आहे आणि ते माझं काम आहे. काही लोकं एखाद्या गोष्टीवर चर्चा करून त्याचं एक मोठं प्रकरण बनवतात.” असं स्पष्टपणे तिने सांगितलं होतं. प्रिया नेहमी सांगते तिला वेगवेगळ्या गोष्टी करायला प्रचंड आवडतात. तिच्या या वाक्याचा प्रत्यय तिने निवडलेल्या प्रत्येक भूमिका पाहिल्यावर येतो. अशा या व्हर्सटाइल अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priya bapat birthday special article know about her versatile career in film industry sva 00