मालिका, चित्रपट, नाटक आणि आता वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये प्रिया बापट आणि उमेश कामतच्या जोडीने एक वेगळा ठसा उमटवला आहे. एकमेकांना जवळपास आठ वर्ष डेट केल्यावर प्रिया-उमेशने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या दोघंही त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून या दोघांनी अलीकडेच राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं.
‘जर तरची गोष्ट’ या नाटकासाठी प्रिया-उमेश अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. यावेळी अभिनेत्रीने तिचे बिकिनीवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमुळे प्रियाला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आलं होतं. याविषयी प्रिया म्हणाली, “मी एकाही ट्रोलरला उत्तर देत नाही…त्या फोटोंवरच्या बऱ्याच कमेंट्स मी वाचल्या. अनेकांनी मला ट्रोल केलं पण, काही लोकांनी माझी बाजू सुद्धा घेतलेली आहे. आपण खूप सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरतो आणि ही गोष्ट मला पटत नाही.”
हेही वाचा : “…तेव्हा मी पहिल्यांदा बाबांना रडताना पाहिलं,” नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ प्रसंग
“मी कोणते कपडे घालावेत यावरून कोणीही माझी संस्कृती काय आहे हे ठरवू शकत नाही. माझं वागणं, माझे आचारविचार, माझ्या घरच्यांनी मला काय शिकवलं आहे, मी चार लोकांमध्ये गेल्यावर कशी वागते, मी माझं काम प्रामाणिकपणे करते की नाही? यावर माझा सुसंस्कृतपणा ठरतो. माझ्या कपड्यांवरून ठरत नाही.” असं स्पष्ट मत प्रियाने मांडलं.
प्रिया पुढे म्हणाली, “ज्या लोकांना साडी नेसल्यावर मी चांगली आणि बिकिनी घातल्यावर मी वाईट वाटत असेन अशा लोकांना मला काहीच उत्तर देण्याची इच्छा होत नाही. व्यक्ती चांगली आहे की वाईट, सुसंस्कृत आहे की असंस्कृत? या गोष्टी ठरवण्यासाठी कपडे पाहणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. काही लोकांना कमेंट्समध्ये माझ्याकडे काम नाहीये म्हणून मी असे कपडे घातले असंही वाटलं. पण, मी त्यांना काय सांगू?” यावर उमेश म्हणाला, “खरंतर या क्षणाला प्रियाकडे प्रचंड काम आहे अनेकदा ती मलाही वेळ देत नाही.”
हेही वाचा : Kajol Deepfake Video: रश्मिकापाठोपाठ काजोलचा ‘डिपफेक’ व्हिडीओ व्हायरल; कपडे बदलतानाची क्लिप चर्चेत
दरम्यान, प्रिया आणि उमेशच्या कामाबद्दल सांगायंच झालं, तर दोघंही सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामध्ये राधा आणि सागर या महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्रीने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.