प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून प्रियाने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात प्रिया-उमेशच्या जोडीला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या जोडप्याने एकमेकांना जवळपास ८ वर्ष डेट केल्यावर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
प्रिया आणि उमेश नुकतेच रेडएफमराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अभिनेत्रीने पैशांच्या नियोजनाबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, “मला माझं मनी मॅनेजमेंट वगैरे जमत नाही…पण, मी अशी खूप खर्चिक मुलगी नाही आहे. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी खर्च करते नाहीतर अनेक महिने मी स्वत:साठी काहीच खर्च करत नाही. पण, माझा शॉपिंगचा मूड असल्यावर मी खूप खर्च करते. मग कोणाचाही विचार करत नाही.”
“माझ्या अशा सवयीमुळे मी खरंच सांगते उमेश, माझे बाबा आणि आमचा सीए हे तीनजण माझ्या पैशांचं व्यवस्थित नियोजन करतात. ही माझ्या विश्वासाची माणसं आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की, हे तीन लोक माझा कधीच वाईट विचार करणार नाहीत किंवा मला चुकीचा सल्ला देणार नाहीत.” असं प्रियाने सांगितलं.
दरम्यान, प्रिया आणि उमेश कामत यांच्या जोडीने मालिका, चित्रपट, वेबसीरिज आणि नाटक अशा सगळ्या माध्यमांवर एकत्र काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या दोघंही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये प्रिया-उमेशसह, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.