अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी नाटकं, चित्रपट, मालिकांमध्ये काम केली. मराठीबरोबरच तिने तिच्या अभिनयाने हिंदी मनोरंजनसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तर आता तिने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला आहे.
प्रियाने नुकतीच ‘कर्ली टेल्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखती तिच्या करिअरबद्दल आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल भरभरून बोलली. त्याचबरोबर तिने तिच्या बालपणीच्या अनेक आठवणीही जागवल्या. प्रिया लहान असताना एकदा एका चुकीमुळे तिच्या आईने तिला घराबाहेर ठेवलं होतं असं म्हणत तिने त्यावेळी नक्की काय झालं होतं ते सांगितलं.
आणखी वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…
ती म्हणाली, “आमच्या घरासमोर एक चौक होता तिथे आम्ही खेळायला जायचो. सगळीच मुलं तिथे खेळायला यायची. तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले की घरी यायचं असं नियम आईने घालून दिला होता. घरी आल्यावर हातपाय धुवून, देवापुढे प्रार्थना म्हणून, ८ वाजता जेवायला बसायचं हे ठरलेलं असायचं. एकदा मी आणि माझी बहीण खेळण्यात रमलो. आम्ही खेळत असताना आई बोलवायलाही आली. पण आम्ही खेळण्यात इतके गुंग होतो की पाच मिनिटं पाच मिनिटं असं म्हणत थेट आठ वाजले.”
पुढे ती म्हणाली, “आम्हाला कळलं की आता आपलं काही खरं नाही. आई ओरडणार. आम्ही गुपचूप घरी गेलो तर आम्हाला शिक्षा म्हणून आईने दाराबाहेरच उभं केलं. तुम्ही दाराला आतून कडी लावली आणि म्हणाली, मी तुम्हाला हाक मारलेली ना घरी चला म्हणून… आता बाहेरच थांबा. बघा कोण जेवायला देता का. आईचं हे बोलणं ऐकून आम्ही रडकुंडीला आलो. बराच वेळा आम्ही घराबाहेरच थांबलो होतो. अखेर आईने आम्हाला घरात घेतलं.” आता प्रियाचं हे बोलणं चांगलंच चर्चेत आलं आहे.