आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या आगामी ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार हे समोर आणलं आहे. या चित्रपटात सर्वांचा लाडका परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातील आकाश ठोसरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक आज समोर आला. या चित्रपटाचं पोस्टर आणि एक मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याने या चित्रपटातील त्याची पहिली झलक दाखवली. त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत आता विविध कलाकारांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तर ‘सैराट’मधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आकाशच्या पोस्टवर केलेली कमेंट आता चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : Video: आधी बुलेट, मग ट्रॅक्टर आणि आता…; रिंकू राजगुरूच्या व्हिडीओवर चाहते फिदा; म्हणाले, “फक्त विमान राहिलंय…”

आकाशने या चित्रपटातील त्याची पहिली झलक शेअर करत लिहिलं, “लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर.” तर त्याने हे पोस्टर शेअर करताच मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करून त्याचं अभिनंदन केलं. या पोस्टवर कमेंट करत रिंकू राजगुरूने लिहिलं, “अभिनंदन…!” तर आकाश ठोसरने देखील तिला रिप्लाय दिला. त्याने या तिच्या कमेंटवर रिप्लाय देत लिहिलं, “धन्यवाद.”

हेही वाचा : “‘घर बंदूक बिरयानी’मध्ये परश्या आहे पण आर्ची का नाही?”; नागराज मंजुळेंनी केला खुलासा, म्हणाले…

तर मध्यंतरी, आकाश ठोसरचं नाव रिंकू राजगुरूशी जोडलं गेलं होतं. त्या दोघांचं अफेअर सुरू आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आकाशने यावर स्पष्ट उत्तर देत या सर्व अफवा असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.