ज्येष्ठ अभिनेते व गश्मीर महाजनीचे वडील रवींद्र महाजनी यांचं दुर्दैवी निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेने पोस्ट शेअर करत रवींद्र महाजनींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आणखी वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब
त्यांच्या पिढीतील सर्वात देखणा अभिनेता अशी रवींद्र महाजनी यांची ओळख होती. रुपालीने तिच्या वडिलांचं रवींद्र महाजनींशी कनेक्शन होतं, असंही सांगितलं आहे. “आम्ही एकाच जिममध्ये वर्कआऊट करायचो. तसेच मला काकांसोबत एका सिनेमात काम करायची संधी मिळाली होती. त्यांची स्टाइल त्यांनी कायम तशीच ठेवली होती. मी त्यांना कधीही भेटले की हँडसम हंक असं म्हणायचे. माझ्या आईचा आवडता अभिनेता. ‘मुंबईचा फौजदार’ या त्यांच्या सिनेमाची प्रिंट माझ्या वडिलांनी केली होती. त्यावेळी हाताने पेंटिंग केले जायचे आणि माझे वडील प्रिंटिंग लाइनमध्ये होते. कम्प्युटर्स येईपर्यंत बाबा स्वतः हातांनी डिझाइन्स बनवायचे, त्यावेळी त्यांनी या सिनेमासाठी काम केलं होतं. पण त्यांची काकांसोबत कधीच भेट झाली नाही. पण आपण म्हणतो ना की आयुष्य गोल आहे तसंच झालं आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं,” असं रुपालीने त्यांच्याबरोबरचा जिममधील फोटो शेअर करत लिहिलं आहे.
रवींद्र महाजनी यांचं पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केलं जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार पोस्ट शेअर करून रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.