मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हिचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असते. आता नुकतीच तिने तिच्या एका मित्राचे पैसे थकवले असल्याची कबुली दिली.
सई ताम्हणकरची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाला लवकरच दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या चित्रपटाचे कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यावेळी सईने अजूनही तिच्या मित्राचे पैसे दिले नसल्याचे सांगितलं.
आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?
या एपिसोडमध्ये भाऊ कदमने सईला एमबीए असं लिहिलेलं एक पुस्तक भेट दिलं. भाऊकडून मिळालेली ही भेट पाहून सईला हसू अनावर झालं. या मागची गोष्ट सांगत सई म्हणाली, “मी काही वर्षांपूर्वी एमबीएला ॲडमिशन घेतले होती. अभिनय क्षेत्रात काम करताना आपला काहीतरी बॅकअप प्लॅन असावा म्हणून मला एमबीए करायचं होतं. माझ्या ज्या मित्राच्या वशिल्याने मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती, त्याचे १५ हजार रुपये मी अजूनही त्याला दिलेले नाहीत आणि त्याला मी ते कधीही देणार नाहीये. पुढे त्या एमबीएचं मी काहीही केलं नाही. त्याची सगळी पुस्तकं माझ्या घरात अजूनही तशीच पडून आहेत.”
सई ताम्हणकरचा हा गमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात ‘चला हवा येऊ द्या’च्या या आगामी भागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.