Ashok Saraf & Sayali Sanjeev : अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची एव्हरग्रीन जोडी ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा सिनेमा १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा प्रीमियर शो पार पडला. महेश कोठारे, प्रिया बेर्डे, लोकेश गुप्ते व कुटुंबीय, जयवंत वाडकर, सुबोध भावे असे अनेक कलाकार ‘अशी ही जमवा जमवी’च्या प्रीमियर शोला उपस्थित होते.
लाडक्या पप्पांच्या नव्या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री सायली संजीव सुद्धा पोहोचली होती. प्रीमियर शोला पोहोचताच अभिनेत्रीने अशोक व निवेदिता सराफ यांची भेट घेतली. यादरम्यानचा एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाडक्या लेकीला प्रेमाने जवळ घेऊन अशोक सराफ यांनी तिची विचारपूस केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर सायलीने निवेदिता यांना मिठी मारून त्यांचीही भेट घेतली. या तिघांनी एकत्र येऊन कॅमेऱ्यासमोर पोज दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सध्या या प्रीमियर शो दरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी बाप-लेकीच्या सुंदर नात्याचं कौतुक करत आहेत.
अशोक व निवेदिता सराफ सायली संजीवला आपली मुलगी मानतात. सायली ‘झी मराठी’च्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे नावारुपाला आली. ही मालिका अशोक सराफ आवर्जून पाहायचे. त्यावेळी सायली सेम निवेदिता यांच्यासारखी दिसते असे अनेकजण म्हणायचे. आपल्याला मुलगी असती तर ती अशीच असती असं अशोक व निवेदिता यांना वाटायचं. त्यामुळे हे दोघंही तिला मुलगी मानतात.
एका म्युझिक लाँचदरम्यान अशोक सराफ व सायली संजीव यांची पहिली भेट झाली होती. यानंतर त्यांनी लाडक्या लेकीचा फोन नंबर सुद्धा पाठ केला. सायली अशोक सराफ यांना ‘पप्पा’ म्हणून हाक मारते. “माझ्या वडिलांच्या निधनानंतर पप्पांच्या रुपाने देवाने माझ्या आयुष्यातली ती पोकळी भरून काढली. आमचं नातं खूप खास आहे. म्हणून मी त्यांना पप्पा म्हणते.” असं सायलीने मुलाखतीत सांगितलं होतं.