चित्रपट तयार करणं ही एक मोठी प्रक्रिया असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपट खरा वाटावा यासाठी अनेक चित्रपटांचं शुटींग लाइव्ह लोकेशन्सवर केलं जातं. अशावेळी १००-१५० लोकांना सांभाळणं हे कधी कधी कठीण होऊन बसतं आणि त्यातून अनेक गमतीजमतीही घडत असतात. आता असाच एक भन्नाट किस्सा ‘दिल दोस्ती दिवानगी’चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडला आहे.
‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात स्मिता गोंदकर, कश्यप परुळेकर, चिराग पाटील, वीणा जगताप यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं शुटींग गोव्यात झालं. तेव्हा चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीला हॉटेलवर विसरून सगळेजण शुटींगला निघून गेले.
या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यात त्यांनी हा मजेशीर किस्सा सांगितला. कश्यप म्हणाला, “आमचं शुटींग गोव्याला सुरू होतं. एके ठिकाणी आउटडोअर शुटींग असल्याने ते काही कारणाने आम्हाला अंधार पडायच्या आत संपवायचं असल्याने सकाळी लवकर करायचं असं ठरलं. त्यासाठी सकाळी तयार होऊन ७ वाजता लोकेशनला जायला निघायचं असं सगळ्यांना सांगितलं गेलं. पण आम्हाला निघायला ८:३० वाजले.”
पुढे तो म्हणाला, “आम्हाला निघायला उशीर होत होता म्हणून त्या वेळात सगळेजण हॉटेलच्याच परिसरात इकडे तिकडे फिरत होते. तर मेकअप उन्हाने जायला नको म्हणून स्मिता तिच्या रूममध्ये जाऊन एसीमध्ये बसली. आमची टीम मोठी असल्याने आमच्या ८ गाड्या होत्या. आठही गाड्यांमधून आम्ही सगळे ८:३० च्या सुमारास लोकेशनवर जायला निघालो. प्रत्येकाला वाटलं की त्या ८ गाड्यांपैकी कोणत्या ना कोणत्या गाडीत स्मिता असेल. आमच्या गाडीत आमची असिस्टंट डायरेक्टर बसली होती. आम्ही लोकेशनला पोहोचण्याच्या १०-१५ मिनिटं आधी तिला कोणाचातरी फोन आला आणि ते बोलणं ऐकून अचानक तिला धक्का बसला. आम्ही तिला विचारलं की काय झालं? तेव्हा तिने सांगितलं की स्मिता हॉटेलवरच राहिली.”
मग स्मिताने सांगितलं की, “मला कळलंच नाही की हे सगळे कधी निघून गेले. अचानक मला शांतता जाणवू लागली तेव्हा मी तेथील एका कर्मचाऱ्याला विचारलं की हे सगळे कुठे आहेत? तेव्हा तएम म्हणाले की सगळे शुटींगला गेले. मग जेव्हा त्यांना कळलं की मी हॉटेलवरच राहिले आहेत तेव्हा त्यांनी माझ्यासाठी गाडी पाठवली आणि मी शुटींगच्या ठिकाणी पोहोचले.”